वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष ( Donald trump second term) म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ट्रम्प यांनी २०१७ मध्ये अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. परंतु २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल रोटुंडा येथे भाषणात अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचं म्हटलं. ट्रम्प म्हणाले, " मागील सरकार (जो बायेडन) हे देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरलं. त्यांनी इतर देशांना सीमा सुरक्षित करण्यासाठी आर्थिक मदत केली. परंतु अमेरिकेच्या सीमा सुरक्षित करण्यात अपयशी ठरले. अतिखर्च आणि ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळं मी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करत आहे." याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य पाठविण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आहेत १० मोठ्या घोषणा
- अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा
- बेकायदेशीर शस्त्रांवर बंदी
- अमेरिकेतील घुसखोरांची हकालपट्टी
- इतर देशांच्या उत्पादनांवर कर वाढवून अमेरिका पुन्हा श्रीमंत कणं
- वंशवाद नष्ट करून सामर्थ्यशाली समाजाची निर्मिती करणं
- पनामा कालवा पुन्हा अमेरिकेकडं घेणं
- अमेरिकेत फक्त पुरुष आणि स्त्री हे लिंग असणार. तृतीयपंथी लिंग रद्द करणं
- कोरोना काळात काढून टाकलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकऱ्या बहाल करणं
- आर्थिक संकटावर मात करण्यासाठी 'ड्रिल बेबी ड्रिल' धोरण लागू करणं
- मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलणं
- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारी सेन्सॉरशिप रोखणं.