ढाका- बांगलादेशातील हिंसक निदर्शने सुरू असताना पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा तडकाफडकीचा राजीनामा दिला. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आज झालेल्या हिंसाचाराच्या नवीन घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी हजारो आंदोलकांनी राजधानीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. आंदोलकांनी ढाका येथील पंतप्रधान हसीना यांच्या राजवाड्यावर हल्ला केला.
Live Updates-
- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आल्या आहेत. त्यांचे विमान आज संध्याकाळी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर उतरले.
- शेख हसीना आता नवी दिल्लीहून दुसऱ्या देशात रवाना होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी इंग्लंड सरकारकडं आश्रय मागितला आहे.
- लोकसभेत टीएमसीच्या खासदारांनी बांगलादेशचा मुद्दा संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, खुर्चीवर बसलेल्या पीठासीन सभापती जगदंबिका पाल यांनी त्यांना या विषयावर बोलू दिले नाही.
- भारतीय रेल्वेने बांगलादेशमधील चिघळलेली स्थिती पाहता 19 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत बांगलादेशला जाणारी कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्सप्रेस ट्रेन रद्द केली आहे. तसेच बांगलादेशला जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत.
- बांगलादेशातील परिस्थितीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले," या समस्येकडे काय करायचे, यावर भारत सरकार निर्णय घेईल. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बंगाल किंवा देशातील शांतता बिघडू शकेल, अशा चिथावणीखोर टिप्पण्या करण्यापासून दूर राहावे."
- माजी परराष्ट्र सचिव आणि बांगलादेशचे माजी राजदूत हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले," विरोधी बीएनपी असो किंवा बांगलादेश जमात- ई-इस्लामी हे संधी साधत आहेत. या आंदोलनात परकीय शक्तींचा सहभाग नाकारू शकत नाही. हा मुद्दा बांगलादेशच्या हितासाठी आणि आमच्या सुरक्षेसाठीदेखील महत्त्वाचा आहे."
- बांगलादेशातील राजकीय संकटावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या (यूबीटी) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बांगलादेशमधील घटना अतिशय दुःखद असल्याचं म्हटलं आहे. "विशेषत: बांगलादेश विकासाकडे वाटचाल करताना आता अराजकतेकडे वाटचाल करत आहे. शेख हसीना यांनी एक स्थिर सरकार दिले होते. सरकार बांगलादेशातील भारतीयांच्या हिताचे रक्षण करेल. कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही," अशी अपेक्षा प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी विद्यार्थी संघटनांनी देशभरात आंदोलन केले. त्यानंतर बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे समर्थक आणि आंदोलकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यात 100 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला. देशात सरकार आणि आंदोलक यांच्यात संघर्ष सुरू राहिला. सैन्यदलाच्या प्रवक्त्यानं म्हटलंकी, सैन्यदलानं हे नेहमीच लोकांच्या पाठिशी राहिलं आहे.