मुंबई :भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील अशी अनेक जोडपी होती, ज्यांनी या वर्षात त्यांच्या नात्याला ब्रेक लावला. या जोडप्यांनी लग्न मोडून सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता अशाच काही जोडप्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. या जोडप्यांबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर देखील झाली होती. चला तर मग जाणून घेऊया, या सेलिब्रिटी कपल्सबद्दल ज्यांनी यावर्षी आपल्या पार्टनरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
एआर रहमान-सायरा बानो :प्रसिद्ध गायक-संगीतकार एआर. रहमान सायरा बानूपासून विभक्त झाल्याच्या बातमीमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. त्यांची घटस्फोटाची बातमी खूप चर्चेत होती. एआर. रहमान आणि त्यांची विभक्त झालेली पत्नी सायरा बानो यांनी 19 नोव्हेंबर 2024 रोजी आपलं वैवाहिक जीवन संपुष्टात आणलं. या जोडप्यानं त्यांच्या विभक्त होण्याचे कारण भावनिक मतभेद असल्याचं सांगितलं. एआर. रहमान आणि सायरा बानू यांची जोडी भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक मानले जाते. आतापर्यंत दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही. दोघेही नेहमीच चांगले मित्र असणार, असं या दोघींनी एका पोस्टव्दारे सांगितलं होतं.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविक यांनी यावर्षी जुलैमध्ये घटस्फोटाची घोषणा केली. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे, त्याचं नाव अगस्त्य आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं 31 मे 2020 रोजी नताशाबरोबर लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 4 वर्षानंतर या जोडप्यानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हार्दिक आणि नताशा यांनी 18 जुलै 2024 रोजी इंस्टाग्रामवर घटस्फोटाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. यानंतर या हाय-प्रोफाइल ब्रेकअपबद्दल चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं होतं.