नागपूर - भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर एका तरुणाचे 9 कोटी रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असून, त्यातील 4 कोटी रुपये वसूल करण्यात आलेत, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलाय. वैभव नावाच्या तरुणाचे अपहरण करण्यात आले असून, त्याला रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यात ठेवण्यात आले असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा नाना पटोले यांनी केलाय. उर्वरित पैशांसाठी त्याच्यावर अत्याचार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. रवींद्र चव्हाण यांच्याकडे इतके पैसे आले कसे, असा प्रश्न पटोलेंनी उपस्थित केलाय. दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी पटोले यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नाना पटोले यांनी बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे असल्याचं ते म्हणालेत.
पटोलेंना खोटे आरोप करण्याची सवय : रवींद्र चव्हाणांनी नाना पटोलेंचे सर्व आरोप फेटाळून लावत नाना पटोलेंनी याआधीसुद्धा असे खोटे आरोप केलेत. त्यांना वेगवेगळ्या नेत्यांवर खोटे आरोप करण्याची सवय आहे. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे, असंही रवींद्र चव्हाण म्हणालेत. नाना पटोले यांचे आरोप नेहमीच टीआरपीसाठी असतात, सवंग प्रसिद्धीसाठी नेहमीप्रमाणे त्यांनी हे वक्तव्य केलंय. आपले नाव भाजपाच्या प्रमुख पदासाठी घेतले जात आहे, त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा सुरू असल्याने आपल्याबाबत आरोप करून या चर्चा घडवण्यास सुरुवात झाल्याचा प्रतिवाद चव्हाण यांनी केलाय. दुसरीकडे राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर बहुजन समाज आणि दलित समाजावर अत्याचार का केले जात आहेत, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केलाय.
ईव्हीएम विरोधातील रोष मांडणार : ईव्हीएम विरोधात राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे, तो मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. विधानसभा, लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडणे, त्यांच्या भावना मांडणे हे आमचे काम आहे. मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांचा परिचय करून देत असताना सत्ताधारी आमदारांमध्ये नैराश्येचे वातावरण असल्याचा दावा त्यांनी केलाय. ईव्हीएमचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी काहीही लावला तरी हे सरकार जनतेच्या मनातील नाही, असे पटोले म्हणालेत. परभणी प्रकरणात बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची विटंबना झाल्यावर तातडीने कारवाई केली असती तर जनतेचा प्रक्षोभ झाला नसता. जनतेची भीती असती तर आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीचार्च केला नसता, असेही नाना पटोले म्हणालेत. ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेलं सरकार राजकीय हत्यासत्र करीत आहे, असा आरोप पटोलेंनी केलाय.
हेही वाचा