शिर्डी ( अहमदनगर ) - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज शिर्डीत दाखल झाली. दुपारी बाराच्या सुमारास ती मंदिर परिसरात पोहोचली तेव्हा साई मंदिरात साईबाबांची दुपारची मध्यान्ह आरती सुरु असल्यानं तिला मंदिराच्या बाहेरच ताटकळत उभं रहावं लागलं. मंदिराच्या बाहेरुनच तिनं साई आरतीत भाग घेतला. यावेळी चाहत्यांना ओळखू नये यासाठी कतरिनानं चेहऱ्यावर मास्क परिधान केला होता. मात्र कतरिना मंदिरात आल्याची बातमी वेगानं पसरली आणि मोठ्या संख्येनं चाहत्यांनी मंदिर परिसरात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
साईबाबांची आरती संपल्यावर कतरिनानं मंदिरात प्रवेश केला आणि साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साई समाधीवर तिनं साई राम अक्षर असलेली सुंदर शालही अर्पण केली. कतरिना साईंचं दर्शन घेत असताना दर्शन रांगेत मराठीतील ज्येष्ठ अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक महेश कोठारेही रांगेमध्ये दिसले. कतरिना दर्शन घेत असताना तेही सामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभे होते. साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर कतरिनानं साई मंदिर ट्रस्टला भेट दिली आणि फोटोसाठी पोजही दिली.
कतरिना कैफ साई भक्त असल्याचं मानलं जातं. ती जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवखी होती तेव्हा ती साईदर्शनासाठी आली होती. आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान झाली असून तिचं विकी कौशल या गुणी अभिनेत्याबरोबर लग्नही झालेलं आहे. अलीकडेच 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरिनाच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली. विकी आणि कतरिनानं आपल्या लग्नाचा वाढदिवस राजस्थानमधील जोधपूरमध्ये साजरा केला. या दरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अलीकडेच विकी कौशलचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा तो आणि कतरिना 'गुड न्यूज' कधी देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र सध्या तरी अशी 'न्यूज' नसल्याचं उत्तर त्यानं दिलं होतं. त्यामुळे विकी आणि कतरिनाच्या घरी पाळणा कधी हलणार, याची उत्सुकता त्यांच्या इतकीच त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.