मुंबई : सुपरस्टार सलमान खान स्टारर 'सिकंदर' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या 'भाईजान' 'सिकंदर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे. दरम्यान 'सिकंदर'च्या निर्मात्यांनी टीझर रिलीजबद्दल डेट जाहीर केली आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सलमानच्या चाहत्यांना ही भेट दिल्यानंतर, सर्वजण खुश आहेत. 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर सलमानच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 27 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहत आहेत. साजिद नाडियादवाला यांच्या 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करत आहे.
सलमान खानच्या वाढदिवशी होईल टीझर रिलीज : आता सलमानच्या वाढदिवशी म्हणजेच 27 डिसेंबर 2024 रोजी 'सिकंदर'ची पहिली झलक त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असून त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'सिकंदर'च्या भूमिकेत सलमान खानचा फर्स्ट लूक पोस्टर त्याच्या 59व्या वाढदिवसाला लॉन्च केला जाईल. 'किक' चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियाडवालाबरोबर काम करत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानबरोबर काजल अग्रवाल, रश्मिका मंदान्ना, सुनील शेट्टी, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सत्यराज, आणि इंजिनी धवन हे कलाकार दिसणार आहेत.
'सिकंदर' चित्रपटाबद्दल : साजिद नाडियादवाला ग्रँडसन निर्मित, हा ॲक्शन चित्रपट आहे. 'सिकंदर' चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रीतम चक्रवर्ती हे संगीत देणार आहे. सध्या सलमान खान हा 'सिकंदर' चित्रपटाची शूटिंग खूप सांभाळून करत आहे. लॉरेंस बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सलमानच्या चाहत्यांना देखील 'सिकंदर' या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये 'भाईजान'चा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या कहाणीबद्दल सध्या काहीही उघड झालेलं नाही. दरम्यान सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या चित्रपटानंतर 'पवन पुत्र भाईजान', 'इन्शाअल्लाह', 'नो एंट्री 2', 'किक 2' आणि 'दबंग 4' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :