मुंबई - रुपेरी पडद्यावरचा प्रतिष्ठित अभिनेता रजनीकांत गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. दिग्दर्शक टीजे ज्ञानवेलच्या 'वेट्टयान' चित्रपटाचं शूटिंग आता पूर्ण झाल्यानं रजनीकांत आता लोकेश कनागराज दिग्दर्शित 'कुली' हा त्याचा पुढचा चित्रपट सुरू करणार आहे. असं असलं तरी दुसऱ्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यानं हिमालयात आध्यात्मिक सहलीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
29 मे रोजी मेगास्टार रजनीकांत हिमालयाकडे निघण्याआधी चेन्नई विमानतळावर दिसला. केदारनाथसारख्या पवित्र स्थळांना भेट देण्याचीही त्याची योजना आहे. रजनीकांतनं आपल्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी दरवर्षी हिमालयात जातो. मी यावेळी केदारनाथ आणि बद्रीनाथ सारख्या आध्यात्मिक स्थळांना भेट देणार आहे. वेट्टय्यान चित्रपट चांगला बनला आहे," असं सांगून त्यानं वेट्टयानच्या निर्मितीवर समाधान व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या शक्यतांबद्दल त्याला विचारलं असता रजनीकांतनं नम्रपणे भाष्य करण्यास नकार दिला आणि "माफ करा, कोणताही राजकीय प्रश्न करु नका," असं म्हणाला. संगीत आणि गीतांच्या महत्त्वाबाबत तामिळ चित्रपट उद्योगात सुरू असलेल्या वादविवादाबद्दल विचारलं असता, त्यानं "नो कॉमेंट्स" अशी साधी प्रतिक्रिया देत भूमिका न घेणे पसंत केलं.