मुंबई -Wayanad Landslide: टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुननं मुख्यमंत्री मदत निधीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. वायनाडमधील विनाशकारी भूस्खलनानंतर पुनर्वसनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी त्यानं एक छोटीशी देणगी दिली आहे. याबद्दल अल्लू अर्जुननं पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. अल्लू अर्जुननं या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून पीडितांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात भीषण भूस्खलन झालं, यात 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अतिवृष्टीमुळे ही घटना घडली, यामुळे भूस्खलन झालं. अनेक लोकांच्या गाड्या आणि घर ही वाहून गेलं. आता अनेक सेलिब्रिटी पुढं येऊन पीडितांची मदत करत आहेत.
अल्लू अर्जुननं वायनाडमधील पीडितांची केली मदत :अल्लू अर्जुननं केरळ मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपये दिल्यानंतर अनेकजण त्याचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. दरम्यान अल्लूनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की, "वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे मी खूप दु:खी आहे. केरळनं मला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे, राज्याच्या पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी, मी केरळ मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपये देणगी देऊन योगदान देऊ इच्छितो. मी तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो." आता अल्लू अर्जुनचे चाहते, त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं यावर लिहिलं, "जगातून सर्वात चांगला हा अभिनेता आहे." आणखी एकानं लिहिलं, "अल्लू अर्जुन हा खरा सुपरस्टार आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.