पाटणा- Bhaiyya Ji Movie Promotion: अभिनेता मनोज बाजपेयी आपल्या 'भैय्या जी' या नवीन चित्रपटद्वारे चित्रपटसृष्टीत शतक ठोकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोज बाजपेयी पाटण्याला पोहोचला होता. यावेळी त्यानं 'भैय्या जी' चित्रपटाबद्दलची माहिती दिली. 'भैय्या जी' हा एक फुल ऑन अॅक्शन चित्रपट असून यामध्ये सावत्र भावांमधील प्रेम दाखवण्यात आलं असल्याचं मनोजनं सांगितलं.
'भैय्या जी' चित्रपटात काय खास आहे?: मनोज बाजपेयीला 'भैय्या जी' चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं की, या चित्रपटातील भैय्या जीची व्यक्तिरेखा लक्ष वेधणारी आहे. सावत्र आई आणि मुलगा यांच्यातील ही कथा आहे. सावत्र भावांच्या प्रेमाची ही कथा आहे. चित्रपटात, मोठ्या भावानं आपल्या वडिलांना वचन दिलं होतं की जोपर्यंत तो आपल्या सावत्र भाऊ आणि आईच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही तोपर्यंत तो त्याच्या आयुष्यात पुढं जाणार नाही.
'भैया जी' चित्रपटाचा ट्विस्ट: मनोज बाजपेयी यांनी सांगितलं की, चित्रपटात एक वेळ अशी येते जेव्हा मोठ्या भावाला कुटुंबाचे रक्षण करायचं की स्वत:चं रक्षण करायचं असा विचित्र पर्याय असतो. तिथूनच चित्रपटातची संपूर्ण कथा सुरू होते. आता पुढची कथा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जावं, असं मनोज बाजपेयी म्हणाला. हा एक अॅक्शन चित्रपट असून त्यातील बहुतांश अॅक्शन सीन्स मी स्वत: केले आहेत, जे लोकांना खूप आवडतील, असं तो म्हणाला.
कथा बिहारशी संबंधित आहे का?:या चित्रपटाची कथा बिहारशी संबंधित आहे का, या प्रश्नावर मनोज बाजपेयी म्हणाला की, ही कथा कुठूल्याही राज्यातली असू शकते. ही कथा मध्य प्रदेशची असू शकते, उत्तर प्रदेशची असू शकते, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कुठेही सेट होऊ शकते. पण आमच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निवड अशी होती की आपण बिहारच्या पार्श्वभूमीवर कथा घेऊ या.
"अनेक वर्षांपासून आपल्या बिहारची धरती आणि माती मुख्य प्रवाहातून हरवत चालली आहे. त्यामुळे बिहारची पार्श्वभूमी आणि बिहारच्या सांस्कृतिक परंपरेशी निगडित लोकांना ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हे खूप संस्मरणीय असेल. असं म्हणतात की बिहारच्या मातीशी घट्ट नातं असलेला 'एक बिहारी सौ पर भारी.' मी बिहारमध्ये वाढलो आहे, शुद्ध जेवण जेवलोय, गायी म्हैशींचं दूध पिलंय आणि याचा परिणाम म्हणून मी स्वतःच अॅक्शन केली आहे." - मनोज बाजपेयी