मुंबई - अभिनेत्री विद्या बालन हिनं 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा शो पाहिला. हा चित्रपट म्हणजे यंदाच्या दिवाळीत मिळालेली सर्वोत्कृष्ट दिवाळी भेट असल्याचं तिनं म्हटलंय. विद्यानं मुंबईच्या आयकॉनिक गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये 'भूल भुलैया 3' चा पहिल्या दिवशी पहिला शो प्रेक्षकांच्या बरोबर पाहिला.
सिनेमा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर विद्या बालननं अतिशय उत्साहामध्ये एएनआयशी संवाद साधला आणि 'भूल भुलैया 3' ची प्रेक्षकांची क्रेझ पाहून तिचा आनंद व्यक्त केला. "गेटी गॅलेक्सी येथे चित्रपटाचा पहिला दिवस पहिला शो पाहून मला खूप छान वाटले. आमच्या प्रेक्षकांना आनंदी पाहण्यापेक्षा चांगले दुसरं काहीही नाही. मी खूप आनंदात आहे. मला आशा आहे की मोठ्या संख्येने लोक चित्रपटगृहात येतील आणि चित्रपट पाहतील," असं ती म्हणाली. विद्याबरोबर तिचा पती आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर होता.
'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे. यात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित नेने आणि तृप्ती दिमरी यांच्याही भूमिका आहेत. विद्या 17 वर्षांनंतर 'भूल भुलैया' फ्रँचायझीमध्ये परतली आहे. त्यामुळं ती अतिशय आनंदात आहे.
गेल्या महिन्यात जयपूरमध्ये तिसऱ्या भागाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान, विद्याने 'भूल भुलैया' कुटुंबात पुन्हा सामील झाल्याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त केली होती. "भूल भुलैया 3 परत आणल्याबद्दल अनीस जी, तुमचे खूप खूप आभार. 17 वर्षांनंतर 'भूल भुलैया'मध्ये परत आल्याबद्दल मी रोमांचित आहे. गेल्या 17 वर्षात मला या चित्रपटासाठी खूप प्रेम मिळाले आहे आणि पुढील 17 वर्षेही मला प्रेम मिळत राहील", असा विश्वास तिनं व्यक्त केला होता.
2007 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये विद्याने मंजुलिकाची आयकॉनिक भूमिका साकारली होती. यामध्ये अक्षय कुमार आणि अमिषा पटेल यांच्याही भूमिका होत्या. अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ स्टारर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे.