कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाले असून आता प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टींना मोठा धक्का बसलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यामुळं ऊस पट्टा असलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षात ऐन विधानसभा निवडणुकीत उभी फूट पडलीय.
अपमानजनक पराभव तरीही काम सुरू : "नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची समजूत घालूनही महाविकास आघाडीशी फारकत घेत शेट्टी यांनी लोकसभा लढवली. मात्र या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की शेट्टी यांच्यावर आली. या निराशाजनक कामगिरीनंतर हताश न होता स्वाभिमानीच्या अनेक निष्ठावंत शिलेदारांनी कोल्हापूर सांगली, सातारा या साखरपट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षाचं काम कायम तेवत ठेवलं," असं वैभव कांबळे म्हणाले.
माझी उमेदवारी रद्द केली : "2009 विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी निराशा पदरी पडली. यानंतर झालेल्या 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची जागा मित्र पक्षाला गेल्यामुळं यावेळीही लढता आलं नाही. मात्र यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तिसरी आघाडी निर्माण केली. यातून हातकणंगले विधानसभेतून 28 ऑक्टोबर रोजी राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, एका रात्रीत सर्व चक्र फिरली आणि हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या गळ्यात महाशक्ती परिवर्तन आघाडीच्या उमेदवारीची माळ पडली," अशा शब्दात वैभव कांबळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
स्वाभिमानीच्या अनेक शिलेदारांचा राजू शेट्टींना रामराम : शेतकरी ऊस आंदोलनाचे केंद्र असलेल्या शिरोळमधून जिल्हा परिषद सदस्य ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा 'संसद शिवार ते संसद' प्रवास केलेल्या राजू शेट्टींचे गेल्या 10 वर्षात अनेक शिलेदार पक्ष सोडून गेले आहेत. राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, देवेंद्र भुयार, सयाजी मोरे, विकास देशमुख, भगवान काटे, सागर कोंडेकर यांचा यामध्ये समावेश आहे.
शरद जोशींच्या संघटनेसारखी अवस्था होऊ नये : राज्यातील शेतकरी संघटनेचे पितामह शरद जोशी यांनी राज्यासह परराज्यातही ऊस कांदा सोयाबीन या पिकांच्या दरासाठी आंदोलनं छेडली होती. ऐन उमेदीच्या काळात त्यांना शेतकरी संघटनेतील बिनीच्या शिलेदारांनी साथ दिली होती. मात्र हेकेखोरी आणि एकाधिकारशाहीला कंटाळून शरद जोशींनाही संघटनेतील सहकाऱ्यांना आधार देता आला नाही. तशी अवस्था स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची होऊ नये, अशा भावना संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यानं केलीय. त्यामुळं राजू शेट्टींनी वेळीच शहाणं व्हावं आणि बळीराजाचं शिवार आनंदानं फुलावं यासाठी संघटित प्रयत्न करावेत अशीच अपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आता करू लागलेत.
हेही वाचा