नागपूर : महायुतीत अनेक नेत्यांनी बंडखोरी केलीय. त्याच बंडखोरांची मनधरणी करण्यात यशस्वी झाल्याचं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. काही नाराज कार्यकर्ते निवडणुकीत उभे आहेत, ते आमचेच लोक आहेत. त्यामुळे त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. अनेकदा रोष असतो, पण अशावेळी पक्षाचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. नाराजांपैकी आम्ही सर्वांनाच समजविण्यात यशस्वी होऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (1 नोव्हेंबर) नागपूर येथील भाजपाच्या विभागीय कार्यालयात लक्ष्मी पूजन करण्यात आले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. "आम्ही दिवाळीच्या दिवशी भाजपाच्या विभागीय कार्यालयात येतो, बरीच वर्षे तर आम्ही डबे घेऊन येत होतो आणि मिळून डबे खात होतो. पण काही काळासाठी त्यात खंड पडला होता, मला आनंद आहे की, एकदा पुन्हा लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटी झाल्यात. कार्यकर्ते, जुने सहकारी यांच्या भेटी घेतल्या आणि गप्पा मारल्यात, त्यामुळं दिवाळी अतिशय आनंदात सुरू आहे," असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणालेत.
राज ठाकरेंची भूमिका वेगळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी यंदा महायुतीच्या विरोधात देखील उमेदवार उभे केलेत. महायुती भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासोबत रिपाइं मित्रपक्ष लढत आहेत. राज ठाकरे यांनी अनेक उमेदवार उभे केल्यामुळे आम्ही समोरासमोर लढत आहोत. महायुती असो की महाविकास आघाडी की मनसे इतर पक्ष आघाड्यांसोबत स्वतंत्रपणे लढत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने युती करू : एखाद, दोन जागी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मनसेच्या विरोधात उमेदवार न देण्याचा विचार करू, मुंबईतील शिवडीच्या जागेवर मुख्यमंत्री यांनी भूमिका घेतली आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
महायुतीचा मुख्यमंत्री होईल : महायुतीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार येणार असून, महायुतीचा मुख्यमंत्री होईल, आताच्या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारचे मुख्यमंत्री प्रमुख आहेत, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करीत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मनोज जरांगे त्यांच्याबद्दल बोलत नाहीत : जरांगेंसंदर्भात त्यांना विचारले असता फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे हे दिवसातून तीन वेळा माझं नाव घेतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने 1982 पासून मराठा आरक्षण अडवून ठेवलं त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा
- "पदरमोड करून गाडीत पेट्रोल टाकलं, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलो मात्र..." स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली खदखद
- तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित आर पाटील यांची डोकेदुखी वाढली, रोहित पाटील नावाचे 4 उमेदवार रिंगणात
- "शिवसेनेच्या उमेदवाराला हरवून सरकारमध्ये सहभागी होणार ", हिना गावित यांनी स्पष्टच सांगितलं