सांगली : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील नावाचे चार उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तासगाव कवठेमहांकाळचे उमेदवार रोहित पाटील यांना आता घेरण्यासाठी डमी उमेदवारांचा डाव आखण्यात आलाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या समर्थकांनी केलाय.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही आता राज्यात लक्षवेधी बनली आहे. या मतदारसंघामध्ये माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात आर.आर. पाटील यांचे कट्टर विरोधक असणारे माजी खासदार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
रोहित पाटील नावाचे चार उमेदवार : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून तब्बल 33 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांच्या यादीमध्ये आता चार रोहित पाटील नावाचे उमेदवार असल्याचं समोर आलय. यामध्ये विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासारख्याच हुबेहूब नावाच्या उमेदवारानं देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ही व्यक्ती तासगाव तालुक्यातल्या चिंचणी या गावची असून रोहित रावसाहेब पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याचबरोबर रोहित राजगोंडा पाटील आणि रोहित राजेंद्र पाटील, अशा रोहित पाटील नावाच्या व्यक्तींनी देखील आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं रोहित पाटील नावाचे चार उमेदवार या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये मैदानात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.
विरोधकांचा डाव असल्याचा आरोप : रोहित पाटील नावाच्या या उमेदवारांच्या अपक्ष उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या समर्थकांनी विरोधकांच्यावर टीका केली आहे. रोहित पाटील नावानं उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारीमागे विरोधकांचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पाटलांना नामोहरम करण्यासाठी आणि मतांची विभागणी करण्यासाठी विरोधकांची ही खेळी असल्याचा आरोप देखील रोहित पाटील यांच्या समर्थकांनी केला आहे. विरोधकांकडून कितीही डाव टाकण्यात आले, तरी रोहित आर.आर. पाटील हेच या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस ताजुद्दीन तांबोळी यांनी केला आहे.
हेही वाचा