मुंबई :अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. दुसऱ्या मंगळवारी या चित्रपटानं 'बाहुबली 2'ला मागे टाकले आहे. हा बॉलिवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा' पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. यानंतर 6 दिवसांत 'छावा'नं 200 कोटी रुपयांची शानदार कमाई केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 225.28 कोटी रुपयांची एकूण कमाई केली.
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'छावा'नं दुसऱ्या आठवड्यातही 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटानं दुसऱ्या शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे 24.03 कोटी, 44.10 कोटी आणि 41.10 कोटी रुपये कमावले. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, विकी कौशल-रश्मिका मंदान्ना स्टारर पीरियड ड्रामानं दुसऱ्या सोमवारी 19.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 11 दिवसांनंतर 'छावा'चं एकूण कलेक्शन 353.61 कोटी रुपयांचं झालं आहे. आता देखील हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.