मुंबई - Usha Uthup Padma Bhushan :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी 22 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात एका समारंभात ज्येष्ठ गायिका उषा उथुप यांना कला क्षेत्रातील पद्मभूषण देऊन सन्मानित केलं. उषा उथुप यांनी प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. उषा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं, "मी खूप आनंदी आहे, माझ्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत तुम्ही सर्व पाहू शकता. माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. देशाकडून आणि अर्थातच आपल्या सरकारकडून यापेक्षा आणखी काय मागता येईल?"
उषा उथुप यांनी व्यक्त केल्या भावना : पुरस्काराचं महत्त्व सांगताना उषा यांनी म्हटलं, "मला खूप छान वाटलं, कारण तुम्ही शास्त्रीय गायक असाल किंवा शास्त्रीय नृत्यांगना असाल आणि तुमच्या कलेत तुम्ही प्रविण असल्यास तुम्हाला अखेरीस पुरस्कार मिळणं स्वाभाविक आहे. लोकांसाठी आम्ही सामान्य माणसं आहोत, त्यामुळे पद्म पुरस्कारासाठी निवड होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझा फक्त शांतता आणि बंधुभावावर विश्वास आहे. माझ्या संगीताद्वारे त्यांना हसवणं, एवढंच मला स्वारस्य आहे." पाच दशकांच्या कारकिर्दीत उषा उथुपनं 'रंबा हो हो', 'कोई यहाँ', 'एक तो चा चा चा' 'हरी ओम हरी'आणि 'डार्लिंग' यांसारख्या हिट गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत.