मुंबई - दिशा पटानीचे वडील आणि निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश पटानी यांना एका मोठ्या फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. दिशाच्या वडिलांची 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सरकारी कमिशनमध्ये उच्च पद मिळवून देण्याच्या नावाखाली दिशाच्या वडिलांची 25 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दिशाच्या वडिलांनी गेल्या शुक्रवारी संध्याकाळी बरेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बरेली पोलिस स्टेशनचे प्रभारी डीके शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितले की, "दिवाकर गर्ग, शिवेंद्र प्रताप सिंह, जुना आखाड्याचे आचार्य जयप्रकाश, प्रीती गर्ग आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हेगारी धमकी, फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या सर्वांचा तपास सुरू केला आहे."
दिशा पटानीचे कुटुंब बरेलीच्या सिव्हिल लाईन्स भागात राहते. मिळालेल्या माहितीनुसार दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी हे शिवेंद्र प्रताप याला ओळखतात. शिवेंद्रच्या माध्यमातून त्यांची जयप्रकाश आणि दिवाकर गर्ग यांच्याशी भेट झाली होती.
दिशा पटानीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक कशी केली? - दिशा पटानीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की, शिवेंद्र यांचे राजकीय संबंध फार पूर्वीचे आहेत. अशा परिस्थितीत शिवेंद्रने दिशाच्या वडिलांना सरकारी कमिशनमध्ये मोठे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे दिशा पटानीच्या वडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली तेव्हा 5 जणांच्या टोळक्याने त्याच्याकडून 25 लाख रुपये घेतले. यामध्ये 5 लाख रुपये रोख आणि 20 लाख रुपये तीन बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
पटानी यांनी पैसे देऊन 3 महिने उलटले, तेव्हा या सर्व आरोपींनी काम न झाल्यास व्याजासह पैसे परत करू, असे सांगितले होते. दरम्यान, जगदीश पटानी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली तेव्हा आरोपींनी आपल्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, दिशा पटानीचे वडील यूपी पोलिसातून सीओ पदावरून निवृत्त झाले आहेत. दरम्यान, दिशाची बहीण लष्करात असून दिशा अभिनेत्री म्हणून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.