पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात असून शेवटच्या टप्प्यात राज्यातील आणि देशभरातील प्रत्येक पक्षाचे नेते राज्यात ठिकठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत. अश्यातच पुणे शहरातील कसबा विधानसभा निवडणुकीची चर्चा राज्यातच नव्हे, तर देशभरात होताना पाहायला मिळत आहे.
ट्रम्पेड वाजवत प्रचार : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर तर भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने हे निवडणूक लढवीत आहे. मात्र, या कसबा मतदारसंघात अजून एका उमेदवाराची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा उमेदवार चक्क रस्त्यावर ट्रम्पेट वाजवत आपला प्रचार करत आहे.
एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी निवडणुकीच्या रिंगणात : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शासन' पक्षाकडून अरविंद वलेकर हा एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी निवडणूक लढवत आहे. अरविंद वलेकर कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी रस्त्यांवर आपल्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना सोबत घेऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या या प्रचाराची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
नागरिकांकडून चांगला प्रतिसाद : "कसबा मतदारसंघात एमपीएससीची तयारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असून त्यांच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही. तसंच जर आपण विधानसभा निवडणुकीत बघितलं, तर अनेक उमेदवार हे घराणेशाही मधील असून सामान्य कुटुंबातील एक अभ्यासू विद्यार्थी देखील निवडणूक लढू शकतो, हा विचार करून मी निवडणूक लढवत आहे. जिथं जिथं मी प्रचारासाठी जात आहे तिथं तिथं नागरिकांकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे," असं अरविंद वलेकर यानं सांगितलं.
हेही वाचा