हैदराबाद - लेडी सुपरस्टार या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नयनतारानं एका खुल्या पत्रामध्ये साऊथचा सुपरस्टार धनुषला फटकारलं आहे. नयनतारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खुल्या पत्रात धनुषला खडे बोल सुनावले आहेत. नयनताराच्या या खुल्या पत्रानं सोशल मीडिया आणि भारतीय चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. खरंतर, हे संपूर्ण प्रकरण नयनताराच्या जीवनावर आधारित 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या माहितीपटाशी संबंधित आहे. 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' प्रोमोमधील 3 सेकंदाच्या व्हिज्युअलवर आक्षेप घेत धनुषने अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जाणून घेऊ हे संपूर्ण प्रकरण काय आहे?
काय आहे संपूर्ण प्रकरण? - अभिनेत्री नयनतारानं धनुषकडे तिच्या 'नयनम राउडी धन' चित्रपटातील गाणी आणि दृश्य 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या तिच्या माहितीपटात वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. याला धनुषनं नकार दिला आणि 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'चा ट्रेलर पाहता अवघ्या 3 सेकंदाच्या व्हिज्युअल चोरीच्या आरोपाखाली अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. नयनतारा स्वतः 'ननुम राउडी धान' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री होती आणि त्यामुळे तिनं या चित्रपटातील गाणी आणि काही व्हिज्युअल्सची मागणी केली होती, पण धनुषने नकार दिल्यानंतर नयनतारा पुढं आली आणि तिनं धनुषविरुद्ध बंड केलं आणि म्हटलं की आता निर्णय न्यायालयात होईल.
'नयनम राउडी धान' या गाण्याचे शीर्षक गीत नयनताराचे पती विघ्नेश शिवन यांनी लिहिलं आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक नयनताराचा नवरा विघ्नेश शिवन आहे. हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला होता. संगीतकार अनिरुद्ध रविचंदरनं हे गाणे स्वतः संगीतबद्ध केलं होतं आणि गायलं होतं.
नयनताराचं खुले पत्र - नयनताराने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे की, तुझे वडील आणि भावामुळे तू यशस्वी अभिनेता झाला आहेस, पण चित्रपटसृष्टीत माझा कोणीही गॉडफादर नव्हता, त्यामुळे मला संघर्ष करावा लागला आणि आज मी माझ्या, माझ्या चाहत्यांमुळे चित्रपटसृष्टीत उभी आहे. त्यांना माझे काम माहीत आहे, आणि ते माझ्या डॉक्युमेंटरीची वाट पाहत आहेत, पण तुझ्या या वृत्तीमुळे आमच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. पण त्याचे परिणाम तुलाही भोगावे लागतील. गेल्या दोन वर्षापासून तू एनओसीसाठी ही गोष्ट रखडून ठेवलीस आणि माझ्या माहितीपटालाही संमती दिली नाहीस. त्यामुळे आता आम्ही ते पुन्हा एडिट करु. ज्या 3 सेकंदच्या दृष्यासाठी 10 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहेस, याचा निकाल आता न्यायालयात लागेल आणि तुझ्या कायदेशीर नोटीसीला उत्तरही कायद्याच्या पद्धतीनंच मिळेल.