महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी आठवणींना दिला उजाळा

मराठी कला क्षेत्रातील सर्वांगी भूमिका करणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

अतुल परचुरे
अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन (ETV Bharat)

मुंबई : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झालंय. अलीकडे त्यांनी आपल्या आरोग्य विषयी एक खुलासा केला होता, त्यामुळे त्यांचे चाहते काळजी करत होते. आपण एका वेदनादायी आजाराशी सामना केल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अतुल परचुरे यांनी खुलासा केला होता की त्यांना कॅन्सरचे निदान झालं होतं. या आजाराबद्दल त्यांना कशी माहिती झाली आणि आता त्यांची तब्येत कशा आहे याचा खुलासा त्यांनी स्वतःचा केला होता. मात्र आज त्यांचं अकाली निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शस्त्रक्रियेला विलंब झाला? : अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. या सुट्टी दरम्यान त्यांची भूक मंदावली होती. काहीतरी गडबड असल्याची त्यांना जाणीव झाली. यावर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली, परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं होतं. यातून ते बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला.

प्रकृती बिघडत गेली : कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर पहिले उपचारच चुकले होते. त्यांच्या पँक्रियाला बाधा झाली आणि अडचणीत वाढ झाली. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना त्यांना डॉक्टरांनी दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचं त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योग्य उपचारांना सुरूवात झाली आणि केमोथेरपी केली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे पूर्णपणे बरे झाले. अलिकडच्या काळात त्यांना कोणताही त्रास होत नव्हता. मात्र, सोमवारी त्यांचं निधन झालं.

"रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो." : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"अतुल परचुरे हा अत्यंत गुणी कलाकार होता. सर्वांशी तो आपुलकीनं, प्रेमानं वागत. कधीही दुसऱ्याला वाईट वागणूक दिली नाही. अभिनयामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. मित्र म्हणून खूप जवळचा आणि महत्त्वाचा व्यक्ती होता. एक जिंदादिल माणूस आपण गमावल्याचं मला दुःख आहे." : अभिनेते मकरंद अनासपुरे

"'नातीगोती' मधील विशेष मुलाची व्यक्तिरेखा असो, की 'पुलं'ची व्यक्तिरेखा सादर करणे असो, अभिनयाच्या तिन्ही सप्तकात फिरणारा कलावंत, माणूसलोभी निर्मळ मित्र अतुल परचुरे! त्यांच्या अनपेक्षित एक्झिटने रंगभूमी मुकी झाल्याची भावना आहे. व्याधीशी लढवय्या प्रमाणं लढलेल्या या हसतमुख उमद्या व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली!" : लेखक प्रवीण दवणे

हिंदी चित्रपटांमध्येही काम : अतुल परचुरे यांनी मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. त्यांनी मराठी दूरचित्रवाणीच्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपट सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. अनेक मराठी नाटकांमधील अतुल परचुरे यांनी केलेल्या भूमिका गाजलेल्या आहेत. त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. अतुल परचुरे यांनी केलेली पु ल देशपांडे यांची भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. अतुल परचुरे यांच्या अकाली एक्झिटनं मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

नाटकांमधील भूमिका खूपच गाजल्या :अतुल परचुरे यांनी केलेल्या वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील भूमिका खूपच गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. इतरही अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या.

हेही वाचा -'नातीगोती' नाटकापासूनचा अभिनय प्रवास; अतुल परचुरेंची थक्क करणारी कारकीर्द

Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details