पुणे : महागाई, बेरोजगारी तसंच युवकांचे विविध प्रश्नाविषयी आणि नशा नको नोकरी द्या हा नारा देत भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक इथं 'हल्ला बोल' आंदोलन करण्यात आलं. परंतु, या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांना घेतलं ताब्यात : पुण्यातील काँग्रेस भवन इथून हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात झाली. हे आंदोलन बालगंधर्व रोड, डेक्कन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होते. परंतु, या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळं बालगंधर्व चौकातच पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनाला परवानगी नसल्यामुळं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
देश पातळीवर आंदोलन करणार : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब म्हणाले की, " देशात सुरू असलेली नशाखोरी आणि बेरोजगारीबाबत युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू असून भाजपा सरकार याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. देशात महागाई, बेरोजगारी याचा प्रश्न ज्वलंत झाला आहे तर, दुसरीकडं मोठ्या प्रमाणावर विविध शहरांत ड्रग्जचा वापर होत आहे. याबाबत आम्ही देशभर आंदोलन पुकराले असून याची सुरवात आज पुण्यातून केली आहे. येणाऱ्या काळात हे आंदोलन राज्यभर केलं जाणार आहे."
हेही वाचा :