महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"हा नंबर एक पुरस्कार!"; महाराष्ट्र भूषण सन्मानानं गौरवल्यावर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया - सुरेश वाडकर लता मंगेशकर पुरस्कार

Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आलाय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गानसम्राज्ञी 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आलाय.

Ashok Saraf awarded Maharashtra Bhushan
Ashok Saraf awarded Maharashtra Bhushan

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 9:50 PM IST

Updated : Feb 23, 2024, 10:15 AM IST

मुंबई Maharashtra Bhushan Award : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. वरळी येथे गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनिषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

अशोक सराफ यांनी मानले आभार -पुढे बोलताना अशोक सराफ म्हणाले की, " मला या पुरस्कारासाठी योग्य समजले, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मला या पुरस्काराची अपेक्षा नव्हती. हा अनपेक्षितपणे मिळालेला सुखद धक्का आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील माझे योगदान पाहून राज्य सरकारनं मला हा पुरस्कार दिला. त्यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो." महाराष्ट्र भूषणसह प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर आणि किरण शांताराम हे उपस्थित राहिले.

नंबर एकचा पुरस्कार :वैविध्यपूर्ण भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे यंदाचे 'महाराष्ट्र भूषणा'चे मानकरी ठरले. पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक सराफ यांनी भावना व्यक्त केल्या. "हा पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील एक नंबरचा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी सरकारनं माझी निवड केली. त्यासाठी मी त्यांचा आणि रसिक प्रेक्षकांचा आभारी आहे. हा पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्यासाठी मी मोठी सन्मानाची गोष्ट समजतो. आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. मात्र हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी विशेष आहे," अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली.

अशोक सराफ यांच्या कार्याचा सन्मान : अशोक सराफ यांचा प्रवास हा आकड्यांमध्ये मोजणं अशक्य आहे. जवळपास 180 मराठी चित्रपट, 52 हिंदी चित्रपट, 12 नाटकं आणि त्याचे हजारो प्रयोग, 10 टीव्ही मालिका आणि कमावलेले अगणित चाहते अशोक सराफ यांच्याकडं आहेत. याच प्रवासाचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारनं अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. भन्नाट टायमिंग, भूमिकेतलं वैविध्य आणि सहजता या जोरावर अशोक सराफ यांनी रंगमंच, चित्रपट आणि मालिका या तिन्हींमध्ये आपला ठसा उमटवला.

पाच दशकांहून अधिक काळ रसिकांचं मनोरंजन-अशोक सराफ यांनी पाच दशकांहून अधिक काळ नाट्य आणि चित्रपट रसिकांचं मनोरंजन केलं. त्यांनी मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपट, मालिका सर्वत्र विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. चेहऱ्यावर भाबडा भाव दाखविणारा विनोदी अभिनेता ते कुटील खलनायक अशा भूमिका करून प्रेक्षकांना थक्कदेखील केलं. परिपक्व चरित्र अभिनेता असो की ग्रामीण भागातील विनोदी पात्र, त्यांच्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांना पसंत पडल्या आहेत. दिवंगत अशोक कुमार उर्फ 'दादामुनी' हे अशोक सराफ यांचे आवडते कलावंत आहेत. 'दादामुनीं'कडून कोणत्याही व्यक्तिरेखेत समरस होऊन जाण्याची कला अशोक सराफ यांना साधली. त्यांच्या बहुआयामी प्रतिभेची दखल महाराष्ट्र सरकारनं घेऊन त्यांना 'महाराष्ट्र भूषण' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरव केला.

सराफांना पुरस्कार प्रदान : अनेक दशकांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करुन आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण करणाऱ्या अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. कलाक्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या पुरस्कारासाठी सराफ यांच्या नावाची घोषणा केली होती. गुरुवारी त्यांना तो प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नाही तर गंभीर ते खलनायकापर्यंत अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या होत्या.

सुरेश वाडकर यांचाही सन्मान : राज्य सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आलाय. ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार गुरुवारी सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आलाय. सुरेश वाडकर यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. पंडित जियालाल वसंत यांच्याकडं ते संगीत शिकले.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी-

  • 'राजकपूर जीवनगौरव पुरस्कार' सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुण इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे. तर 'राजकपूर विशेष योगदान पुरस्कार' सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी श्री. विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे.
  • ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक श्री. रवींद्र साठे आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे.

हेहा वाचा-

  1. "अफलातून" नायकास पुरस्कार देताना सरकारनं "बनवाबनवी" केली नाही, अशोक मामांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर
  2. 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांच्या कला जीवनातील जाणून घ्या टर्निंग पॉइंट, बहुरुपी अभिनयापासून झाले विनोदाचा बादशाह!
Last Updated : Feb 23, 2024, 10:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details