मुंबई - Tiger Vs Pathan : हिंदी चित्रपटसृष्टीचे दोन मास सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर व्हर्सेस पठाण'चे शूटिंग रखडणार असल्याची कुजबूज सुरू झाली होती. या चर्चेला पूर्ण विराम देत 'टायगर व्हर्सेस पठाण' या चित्रपटाच्या शूटिंगची तारीख ठरवण्यात आली आहे. या संदर्भातले मोठे अपडेट शाहरुख-सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता बनली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग तारखावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दोन मास सुपरस्टार्स एकमेकांविरुद्ध दंड थोपटणार -'टायगर व्हर्सेस पठाण'चे शूटिंग 2026 मध्ये सुरू होईल आणि 100 दिवसांत हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होईल. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 2027 मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग पूर्वी 'पठाण' 2 चे शूटिंग सुरू होणार आहे. 'टायगर व्हर्सेस पठाण'ची कथा पठाण 2 मध्ये घडणाऱ्या कथानकापासून सुरू होईल आणि दोन मास सुपरस्टार्स एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकतील.
'टायगर व्हर्सेस पठाण'चे शूटिंग कधी सुरू होणार? -यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आणि शाहरुख खान यांनी आपल्या बिझी शूटिंग शेड्यूलमधून या चित्रपटासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. शाहरुख-सलमानने निर्मात्यांसोबत त्यांच्या नियोजित तारखा स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार शूटिंगचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 'टायगर व्हर्सेस पठाण' हा यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्समधील आतापर्यंतचा सर्वात मास अॅक्शन चित्रपट असणार आहे. चित्रपटातील इतर कलाकारांची निश्चित अद्याप झालेली नसून त्यावर निर्माते आणि त्यांची कास्टिंग टीम काम करत आहे. चित्रपटाच्या कथानकाचे प्रारुप तयार असून त्यापद्धतीने निर्मितीच्या प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग भारतासह अनेक देशातील सर्वोत्तम लोकेशन्सवर केले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
'टायगरव्हर्सेसपठाण'मधील अभिनेत्री -पण दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांनी यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये यापूर्वी चमकलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांची वर्णी आगामी चित्रपटात लागणार की नाही ही गोष्ट अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. दीपिका पदुकोण 'पठाण'मध्ये रुबीनाच्या भूमिकेत दिसली होती तर टायगर चित्रपट मालिकेत कतरिना कैफ एजंट झोयाच्या भूमिकेत दिसली आहे. दरम्यान, सलमाम खानने 'टायगर व्हर्सेस पठाण' 'या चित्रपटावर काम सुरू असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -
- इमरान हाश्मी 'डॉन 3'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार का? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
- रश्मिका मंदान्नाने मिलान फॅशन वीक 2024 पूर्वी दाखवली तिच्या ग्लॅम ग्राइंडची झलक
- भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसलानं कुमार आडनाव टाकेल काढून, टी-सीरीजला केलं अनफॉलो