मुंबई - महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणाऱ्या ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’ला १० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हा महोत्सव 10 ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. या प्रतिष्ठीत महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटानं थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होईल.
परदेशातील विशेषत: हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी सहज उपलब्ध होत असतात. पण जागतिक स्तरावर गाजत असलेले आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशानं एशियन फिल्म फाऊंडेशनच्या वतीनं थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन सुरू करण्यात आलंय. पहिला महोत्सव ३ ऑगस्ट २००२ रोजी आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव मुंबईत अविरतपणे आयोजित केला जात आहे.
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीमध्ये आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरियामधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.