जवळपास सर्व भारतीय आणि काही परदेशी भाषांमधल्या गाण्यांना आपल्या अद्वितीय स्वरांनी अजरामर करणारे पार्श्वगायक म्हणजे मोहम्मद रफी. त्यांनी गायलेली एकाहून एक सरस गाणी, संगीतप्रेमींच्या ह्रदयातलं त्यांचं अढळ स्थान याविषयी बरंच लिहीलं आणि बोललं गेलं आहे. त्यामुळे मोहम्मद रफी नावाचा परीसस्पर्श झालेल्या गाण्यांची आर्तता, नजाकत, सूरांची ठेवण वगैरे वगैरे मुद्यांवर नव्याने चर्चा करण्यापेक्षा 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसाठी मोहम्मद रफी यांच्याबद्दलच्या रंजक बाबी जाणून घेत स्वरांच्या अनभिषिक्त सम्राटाची शंभरावी जयंती आपण साजरी करू या.
फकीर ठरले पहिले गुरु ः24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुलतान सिंग भागातील एका खेडेगावात अल्लारखी आणि हाजी मोहम्मद अली या आई-वडिलांचं अपत्य असलेल्या रफीच्या अख्ख्या घराण्याचा संगीतक्षेत्राशी दुरान्वयेही संबंध नव्हता. आपला मुलगा गातो याचं भान अल्लारखी आणि हाजी मोहम्मद अली या दाम्पत्याला आलं ते एका फकिरामुळे. त्यांच्या गावात एक फकीर दररोज गात गात फेरी मारत असत. एक दिवस छोटा रफी संमोहित झाल्यासारखा त्यांच्या मागे मागे गेला. ते फकीर जणू शागिर्दाला गुरुमंत्र देऊन गेले. त्यांचं अनुकरण करत छोटा रफी गायला लागला. वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्यांदाच लाहोरमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात के एल सैगल यांचं गाणं गात या बाल जादूगाराने अक्षरशः मैफिलीचा ताबा मिळवला. पुढे या बालकाने 1941 साली म्हणजे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी पंजाबी चित्रपट 'गुल बलोच' साठी 'सोनिये नी, हीरिये नी' हे गाणं रेकॉर्ड केलं. या चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना त्याकाळी 5 रुपये मानधन मिळालं होतं. भविष्यात सुरु होणाऱ्या 'रफीयुगा'ची ही नांदी होती. याच वर्षी 'ऑल इंडिया रेडियो लाहोर स्टेशन'ने या मिसरुड फुटलेल्या गाण्यासाठी निमंत्रण दिलं.
मुंबईत प्रचंड संघर्ष ःरफी यांनी काही वर्षांनी मायानगरी मुंबई गाठली. इथे काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मुंबईतल्या वांद्रे उपनगरात असलेलं रफी कुटुंबीयांचं घर म्हणजे मोहम्मद रफी यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या प्रार्थनास्थळासारखं आहे. आज मोहम्मद रफी यांच्या कष्ट आणि प्रतिभेच्या पायावर उभ्या राहिलेल्या वास्तूत त्यांचे कुटुंबीय आनंदाने वास्तव्य करत आहेत. रफी मुंबईत आले तेव्हा त्यांनी आणि हमीद साहब यांनी दक्षिण मुंबईतल्या भेंडी बाजार परिसरात दहा बाय दहाची खोली अर्थातच भाडेतत्वार घेतली. या खोलीत त्यांनी बस्तान बसवलं. निर्माता, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शकांचे उंबरे झिजवण्यासाठी रफी सकाळी घर सोडून आणि रात्री परत घरी येत. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच संघर्ष... 1945 साली 'गाँव की गोरी' चित्रपटातून त्यांचं हिंदीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण झालं.
सुमारे 50 संगीत दिग्दर्शकांबरोबर कामःपार्श्वगायक म्हणून आपल्या त्यांनी आपल्या नावे अनेक विक्रमांची नोंद केली. यातले अनेक विक्रम तर आजही अबाधित आहेत. आपल्या सुमारे चार दशकांच्या पार्श्वगायन कारकिर्दीत त्यांनी सुमारे पन्नासहून अधिक संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं. यात जवळपास सर्व भारतीय भाषांमधल्या गाण्यांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी हिंदीत सर्वाधिक गाणी नौशाद अली यांच्या संगीत दिग्दर्शनात गायली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीत दिग्दर्शक जोडीचेही ते आवडते पार्श्वगायक होते.
सर्वगुणसंपन्न रफी ःमोहम्मद रफी यांची ओळख अख्ख्या जगाला पार्श्वगायक म्हणून आहे, हे खरंच. ते उत्तम हार्मोनियम वादक होते. अनेक गाण्यांच्या रेकॉर्डिंगला त्यांनी स्वतः हार्मोनियम वाजवल्याचीही उदाहरणं आहेत. उस्ताद बडे गुलाम अली खान यांचे धाकटे बंधू उस्ताद बरकत अली खान यांच्याकडून रफी यांनी गायकीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. शिवाय त्यांनी उस्ताद अब्दुल वहीद खान, पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी यांच्याकडूनही शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन घेतलं. बरं. मोहम्मद रफी यांनी चित्रपटांमधून अभिनय केला, हे किती जणांना ठाऊक असेल? 'जुगनू' आणि 'लैला मजनू' या चित्रपटांमधून मोहम्मद रफी अभिनेता म्हणून दिसले. तेवढ्यावरच त्यांची अभिनयाची हौस भागली आणि गड्या, आपलं गाणंच बरं... असा विचार करत रफी पुन्हा आपल्या हक्काच्या कार्यक्षेत्रामध्ये रमले. आणखी एक. मोहम्मद रफी हे उत्तम बॅडमिन्टनपटू होते. फावल्या वेळात ते आपल्या मित्रांबरोबर मनसोक्त बॅडमिन्टन खेळत.
रफी आणि मराठी :मराठी भाषेवर मोहम्मद रफी यांचंं विशेष प्रेम होतं. रफी यांनी गायलेलं प्रत्येक मराठी गाणं संगीतरसिकांच्या 'मर्मबंधातली ठेव' ठरलं आहे. चित्रपटसंगीताच्या प्रांतात श्रीकांतजी नावाने प्रसिद्ध दिवंगत संगीत दिग्दर्शक श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी यांच्याकडून एकाहून एक सरस मराठी गीतं गावून घेतली. श्रीकांतजी स्वतः उत्तम व्हायोलिन वादक आणि उर्दू भाषेचे जाणकार! रफी आणि श्रीकांतजी यांच्यात भावबंध न जुळतात, तरच नवल! दोघांनाही एकमेकांबद्दल पराकोटीचा आदर. पार्श्वगायक आणि संगीत दिग्दर्शक यांच्यातलं अनोखं 'गिव्ह अँड टेक' या जोडगोळीच्या गाण्यांमधून जाणवतं. शोधिसी मानवा राउळी मंदिरी, हसा मुलांनो हसा ही भिन्न जातकुळीची गाणी मोहम्मद रफी यांनी समरसून गायली. हा छंद जीवाला लावी पिसे, म्हणजे कळसच!
संगीतसेवा हीच 'इबादत' :मोहम्मद रफी यांचं उर्दूवर प्रभुत्व होतं. 'पर्दा है पर्दा', 'रंग और नूर की बारात' सारख्या कव्वाली, गज़ल प्रकारात ज्याप्रमाणे गहिरे रंग सोडत त्याचप्रमाणे 'मन तडपत हरी दर्शन को', 'मधुबन में राधिका', 'तू गंगा की मौज' ही समरसून गात. 'बैजू बावरा' चित्रपटातलं अतिशय गुंतागुंतीच्या सुरावटीचं भजन रफी यांनी अवघ्या वीस मिनिटांत परफेक्ट रेकॉर्ड केलं होतं. 'हम किसी से कम नहीं' मधलं 'क्या हुआ तेरा वादा' त्यांनी एका टेकमध्ये ओके केलं होतं. शम्मी कपूर स्टाईलच्या 'उछलकूद'छाप गाण्यात तर त्यांच्या हातखंडा. विशेष म्हणजे ते ज्या अभिनेत्यासाठी गात, ते गाणं त्या अभिनेत्याचं होऊन जात असे. दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, धर्मेंद्रसारख्या नायकांना उसना आवाज देणारे रफी तेल मालिश म्हणत जॉनी वॉकरसाठी गात तेव्हा ते गाणं जॉनी वॉकरच्याच गळ्यातून आलं असावं, असं वाटे. मेहमूदबद्दलही तेच. 'जंजीर' मध्ये तर त्यांनी गीतकार गुलशन बावरा यांच्यासाठी आवाज दिला. अशी असंख्य उदाहरणं आहेत. 'दोस्ती' मधली गाणी कोणता संगीतरसिक विसरु शकेल! इतकंच कशाला? आयुष्यभर मद्याच्या थेंबालाही स्पर्श न केलेल्या रफी यांनी 'छू लेने दो नाजूक होठों को' गात अट्टल मद्यपींनाही क्लीन बोल्ड करण्याची करामत दाखवली.
गाड्यांचे शौकीन रफी, 'कनवाळू' रफी :बहुसंख्य वेळा श्वेत वस्त्रात वावरणारे मोहम्मद रफी नीट-नेटकेपणाच्या बाबतीत कमालीचे आग्रही होते. रफी यांना महागड्या गाड्यांचा शौक होता. परदेशात लॉंच झालेची कार भारतात पहिल्यांदा रफी यांच्या गॅरेजची शान बनत असे. अशा अनेक गाड्यांचे भारतातले पहिले मालक ठरण्याचा मान रफी यांनी मिळवला आहे. आपल्या सहकाऱ्यांना, वादक कलाकारांना मदत करण्यासाठी ते कायम तत्पर असत. अडचणीत असलेल्या, पहिल्यांदाच निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांकडे तर ते अनेकदा मोबदला न घेता गायल्याची उदाहरणं आहेत. आपल्या एका आजारी वादक कलाकाराच्या उशाशी दहा हजार (साठच्या दशकातले) रुपये ठेऊन त्याची वाच्यता न करणारेही रफीच.
शेवटचं गीत :मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गायलेल्या जवळपास प्रत्येक गाण्यात 'रफी टच' दिसल्यावाचून राहत नाही. 'शाम फिर क्यों उदास है दोस्त, तू कहीं आस पास है दोस्त' हे मोहम्मद रफी यांनी गायलेलं शेवटचं गाणं. हे गाणं रेकॉर्ड केलं आणि पाच ते सहा तासांतच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. 31 जुलै 1980 हा दिवस लाखो संगीतप्रेमीच्या काळजावर आघात करुन गेला. मात्र रफी गेले असं कधीच वाटलं नाही. त्यांनीच आपल्या शेवटच्या गाण्यातल्या ओळीत असं म्हणून ठेवलंय.