मुंबई - Bunty Bundalbaaz movie : मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असते. शालेय जीवनातही विद्यार्थ्यांमध्ये टॉप येण्यासाठी अहमहमिका असते. याच गोष्टीचा धागा पकडून एक नवीन चित्रपट बनत आहे. 'बंटी बंडलबाज' असं नाव असलेल्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा दोन विद्यार्थ्यांवर आधारित आहे, जे इंटरनेट आणि लॅपटॉपच्या साहाय्यानं परीक्षेला न बसता शाळेत प्रथम येण्याचा प्रयत्न करतात. या दोन मुलांच्या शाळेतल्या धमाल-मस्तीचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळेल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत रुमडे यांनी केले असून, त्यांनीच कथा, संवाद आणि पटकथालेखनाची जबाबदारीही सांभाळली आहे. छायांकनाची जबाबदारी सिनेमेटोग्राफर प्रताप राऊत यांनी उचलली आहे. यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. वैदही कृष्णन, ईशान महापात्रा, नेहा कोळवणकर आणि विवेक कदम यांनी निर्मितीची धुरा वाहिली आहे.
'बंटी बंडलबाज' या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत ओम बेंडखळे, सार्थक पाटील, गणेश रेवडेकर, आणि आकांक्षा गाडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.