मुंबई - interview with Shruti Marathe : अभिनेत्री श्रुती मराठेनं 'सनई चौघडे' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच तिला 'इंदिरा विझा' या तामिळ चित्रपटात काम मिळालं. श्रुती मराठी हिंदीचित्रपटामध्ये काम करतेच, तसेच तिचा तामिळ आणि कन्नड मनोरंजनसृष्टीतही वावर असतो. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ती श्रुती मराठे हे नाव न वापरता श्रुती प्रकाश असं नाव लावते. 'पेशवाई' मधून बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत आलेल्या श्रुतीला 'राधा ही बावरी' या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'जागो मोहन प्यारे' मधील तिच्या भूमिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता 'रमा माधव', 'तप्तपदी', 'बंध नायलॉनचे', 'बुधिया सिंग – बॉर्न टू रन', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर' सारख्या चित्रपटांतून श्रुती झळकली असून तिची भूमिका असलेला नवीन मराठी चित्रपट 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित झालाय. आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांनी श्रुती मराठेची भेट घेतली आणि गप्पा मारल्या त्यातील काही अंश.
तुझा 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा नवीन चित्रपट येऊ घातलाय. त्यातील तुझी भूमिका आणि अनुभव याबाबद्दल काय सांगशील ?
'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर'मध्ये मी अदिती या तरुणीची भूमिका करीत आहे. ती एक फॅशन डिझाइनर असून तिचे ५-६ मित्र मैत्रिणी यांच्यासोबतच्या घटनांचा कोलाज म्हणजे हा चित्रपट. यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर साटम, उमेश कामत, आनंद इंगळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी आहेत. या सर्वांबरोबर काम करताना मजा तर आलीच परंतु बरंच काही शिकायला मिळालं. हा चित्रपट मैत्री आणि नात्यांवर बेतला असून चाळिशीनंतर प्रत्येकात घडणारे बदल यातून अधोरेखित करण्यात आले आहेत. बऱ्याचदा बऱ्याच जणांना मनातील बोलता येत नाही. चाळिशीपर्यंत अनुभवांचे गाठोडे सोबत असते आणि निसर्ग नियमांप्रमाणे वागण्यात बदल घडत असतो. यात आम्ही सात मित्र मैत्रिणी आहोत आणि कुणाची जोडी कुणासोबत आहे हे ट्रेलरमधून उघड करण्यात आलेले नाहीये. तसेच ट्रेलर मध्ये दोन आवाज ऐकू येतात, एक किस चा तर दुसरा थप्पड मारल्याचा. हे काय गौडबंगाल काय आहे हें चित्रपट पाहिल्यावरच समजेल. (हसते).
किस बद्दल मराठी प्रेक्षक काही ऑब्जेक्शन घेतील असे वाटते?
अजिबात नाही. ट्रेलरमध्ये फक्त आवाज ऐकू येतो. तसेच किसची काय गम्मत आहे याची आमच्याशिवाय कोणाला कल्पना नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी प्रेक्षक प्रगल्भ झालाय, हुशार झालाय. त्यामुळं मला नाही वाटत की कोणी काही ऑब्जेक्शन घेईल. तसेच मराठी प्रेक्षक नवीन आयडीयाज, सब्जेक्ट्सची वाट बघत असतो. आमचं कर्तव्य हे आहे की ते त्याच्यापर्यंत नीटपणे पोहोचवणे. आमचा सिनेमा फॅमिली ऑडियन्ससाठी असून भरपूर मनोरंजन करणारा आहे.