मुंबई - सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिलाच चित्रपट नव्या वर्षात थिएटरमध्ये झळकणार आहे. यापूर्वी त्यानं महाराज या चित्रपटातून चित्रपटसृष्टी पदार्पण केलं आहे. परंतु हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. आता त्याचा 'लवयापा' हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा रफ कट पाहिल्यानंतर स्वतः आमिर खान खूप खूश झाला आहे. 'लवयापा'चा रफ कट पाहून त्यानं अभिनेत्री खुशी कपूरची तुलना तिची आई श्रीदेवीशी केली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'महाराजा' या पहिल्या चित्रपटानंतर जुनैद खानचा आगामी 'लवयापा' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट थिटरमध्ये रिलीज होत आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात जयदीप अहलावत आणि शर्वरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
"मी खूप उत्साही आणि आनंदी झालो आहे. हा एक अतिशय रोमांचक सिनेमा आहे. मला वाटतं की ही माझ्यासाठी अगदी नवीन प्रकारची भूमिका आहे, 'महाराज' पेक्षा खूप वेगळी आहे - त्यामुळे एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. ही माझी पहिलीच थिएटर रिलीज आहे.," असं जुनेद खान म्हणाला.'लवयापा' 7 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आमिर खाननं चित्रपटाचा रफ कट पाहिल्यानंतर याबद्दलची आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. "मी रफ कट पाहिला. मला हा चित्रपट आवडला. तो खूप मनोरंजक आहे. सेलफोनमुळे आजकाल आपलं आयुष्य ज्या प्रकारे बदललंय आणि यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक मनोरंजक गोष्टी यात दाखवल्या आहेत. सर्व कलाकारांनी यात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मी जेव्हा पडद्यावर खूशी कपूरला पाहिलं तेव्हा मला काही वेळ वाटत राहिलं की मी श्रीदेवीलाच पाहात आहे. तिच्यातली उर्जा यात दिसून आली. मी श्रीदेवीचा खूप मोठा चाहता आहे., असं आमिर म्हणाला.
आमिर खाननं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरील चाहत्यांचं प्रेम देखील व्यक्त केलं आणि तिची मुलगी खुशी कपूरच्या अभिनयात त्याला साम्य देखील आढळलं. "मी श्रीदेवीचा खूप मोठा फॅन आहे. मला नेहमीच तिच्याबरोबर काम करायचं होतं. ती एक हुशार आमि चतुरस्त्र कलाकार होती. कॅमेरा बंद असताना तिनं नेहमीच तिची प्रतिभा अव्यक्त ठेवली. परंतु कॅमेरा रोल होताच, तिने तिची खरी प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. ती एक उर्जा दाखवायची जी मला खुशी कपूरच्या अभिनयासारखीच वाटली," असं आमिर पुढे म्हणाला.
दिवंगत श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी खुशी हिनं गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या झोया अख्तरच्या दिग्दर्शित 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य यांचंही पदार्पण झालं होतं.
आमिर खानचा मुलगा जुनैद खान साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो. कित्येकवेळा तो ऑटो रिक्शा पकडताना दिसला आहे. याबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, "खरं तर, आम्ही थोडं वेगळं आहोत. आम्ही आमचे आयुष्य असंच जगतो. मी त्याला कार खरेदी करायला सांगितलंय."
'लाल सिंग चड्ढा'चे दिग्दर्शन करणारा अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अलीकडेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'लवयापा'चा टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया शेअर केल्या, ज्यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांचाही समावेश आहे. शाहरुखनं म्हटलंय की, "हे गाणे खूप गोड आहे. जुनैदसारखं सौम्य. ऑल द बेस्ट खुशी. 'लवयापा' कपल आणि टीमसाठी माझे खूप प्रेम."
तर सलमानने गाण्याची क्लिप पोस्ट केली आणि लिहिलं, "जुनेद खान आणि खुशी कपूरला शुभेच्छा." सोशल मीडियाच्या जमान्यात जुनैद आणि खुशी यांच्यात शेअर केलेली मजेदार केमिस्ट्री या गाण्यात दाखवण्यात आली आहे. नकाश अझीझ आणि मधुबंती बागची यांनी गाण्याला आवाज दिला आहे.