मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीत तयार होणाऱ्या चित्रपटांना भारतातील सर्वच विभागातील प्रेक्षक पसंती देताना दिसतात. पॅन इंडिया चित्रपटांची सुरुवात जरी साऊथमधून झालेली असली तरी असंख्य असे चित्रपट आहेत जे डब होऊन भारतातील इतर भाषिक प्रेक्षकापर्यंत पोहोचत असतात. साऊथच्या हिरोजची एक वेगळी धमाकेदार स्टाईल लोकांना आवडते. याच श्रेणीमध्ये अव्वल नाव आहे थलपती विजय याचं. त्याचा 'बीस्ट' हा चित्रपट साऊथमधील प्रेक्षकांना वेड लावून गेला. आता हाच चित्रपट मराठीत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
थलपती विजयच्या 'बीस्ट' चित्रपटाचा मराठीमध्ये होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर - BEAST MARATHI WORLD TV PREMIERE
थलपती विजयचा बीस्ट हा ब्लॉकबस्टर चित्रपट मराठीत पाहता येणार आहे. याचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर होणार असून तो कुठल्या दिवशी, कुठं दिसेल हे जाणून घेण्यासाठी वाचा.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Nov 19, 2024, 7:03 PM IST
आपल्या दमदार अॅक्शनसाठी ओळखला जाणारा थलपती विजयचा 'बीस्ट' हा एक थरारक कथानक असलेला चित्रपट आहे. यामध्ये त्यानं विर राघवन ही व्यक्तीरेखा साकारली आहे. यातील थलापती विजयच्या लूकनं चाहत्यांची मन जिंकून घेतली आहेत. यामध्ये तो 'रॉ' चा अधिकारी म्हणून झळकला आहे. एका मिशनसाठी त्यानं तीन महिन्यांपासून तयारी केली आहे. मात्र अखेरच्या क्षणी सरकार हे मिशन रद्द करण्याचा निर्णय घेतं. परंतु वीर राघवन स्वतःच्या बॉसच्या आदेशाविरुद्ध मूळ योजनेनुसार मिशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतो आणि हे मिशन तो यशस्वीरित्या पार पाडतो. पण या मिशनचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. पुढे जे काही थरारक घडतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक असणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत बॉक्स ऑफिसवर तब्बल २५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता हा चित्रपट मराठीत पाहण्याची गंमत अनुभवता येणार आहे.
'बीस्ट' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रीमियर 24 नोव्हेंबरला संध्याकाळी सन मराठीवर होणार आहे. निवडणुकीचे निकाल पाहून झाल्यानंतर राजकीय गोष्टी पाहून आलेला थकवा दूर करण्यासाठी थलपती विजयचा हा चित्रपट एक पर्वणी ठरणार आहे. सुपरस्टार थलपती विजयबरोबरच पूजा हेगडे, सेल्वा राघवन, अंकुर विक आणि बऱ्याच दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनयाचा अनुभव मराठी भाषेत घेता येणार आहे. तुम्ही जर साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर त्याचा हा चित्रपट तुमचं चांगलं मनोरंजन करु शकतो.