मुंबई - 'स्क्विड गेम' नावाची एक कोरियन मालिका नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाल्यानंतर जगभरातील प्रेक्षकांना एक हादरा बसला होता. जगात कुणीही कल्पना केली नसेल असं कथानक असलेला हा शो पाहून लोक अस्वस्थ झाले होते. एका अफाट मोठ्या बक्षिसाची ( 45.6 अब्ज वॉन ) रक्कम जिंकण्यासाठी स्पर्धक गेम शोमध्ये भाग घेतात आणि अतिशय साधे वाटणारे लहानपणीचे खेळ खेळतात. खेळातून बाद होणं हा प्रत्येक खेळाचा एक नियम असतो त्या प्रमाणे याही खेळात बाद होतात, पण ते खेळातून नव्हे तर आयुष्यातूनच आऊट होतात. थोडक्यात खेळातून बाद होणं म्हणजे मरण पत्करणं. तर 'स्क्विड गेम' ही मालिका नेटफ्लिक्सवर आली आणि आजवर जगात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली.
आता याच 'स्क्विड गेम' मालिकेचा दुसरा भाग येणार आहे. त्याचा एक अपेक्षित टिझर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सेओंग गि-हुन रेड लाइट आणि ग्रीन लाइटमध्ये स्पर्धकांच्या नवीन गटासह खेळताना दिसत आहे. 'स्क्विड गेम'च्या दुसऱ्या सीझनची कथा पहिल्या सीझनच्या शेवटी सेओंग गि-हुनने घेतलेल्या निर्णयांवरून पुढे सुरू होईल. सेओंग अमेरिकेला जाण्याचा विचार कसा सोडून देतो आणि एका उद्देशाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करतो हे यात पाहता येईल. या मालिकेचे दिग्दर्शन ह्वांग डोंग-ह्युक यांनी केले असून फर्स्टमन स्टुडिओची निर्मित आहे.