मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणतील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) चकमक प्रकरणात नवं वळण आलं आहे. हा खटला आपल्याला यापुढे लढायचा नसून प्रकरण बंद करावं, अशी विनंती अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. गुरुवारी याप्रकरणाची न्या. रेवती डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी शिंदेच्या आई-वडिलांनी ही विनंती केली. याची न्यायालयाने दखल घेतली असून शुक्रवारी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
पोलिसांवर गुन्हा का दाखल नाही? : अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. यासंदर्भात २० जानेवारीला महानगर दंडाधिकारी यांचा अहवाल आला होता. अहवालात पोलीस अधिकाऱ्यांपैकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि पोलीस कर्मचारी अभिजीत मोरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. अहवाल सादर झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील पोलिसांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ठपका ठेवण्यात आलेल्या पोलिसांनी याबाबत याचिका दाखल केली. यासंदर्भात दोषी अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, ठपका ठेवण्यात आलेल्या पोलिसांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयानं केला. त्यावर विशेष सरकारी वकिल अमित देसाई यांनी सांगितलं, "राज्याच्या सीआयडीकडून याप्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसंच मानवाधिकार आयोगातर्फेदेखील चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं कारवाई करण्याबाबत कायदेशीर अडचणी आहेत". पोलिसांवर बनावट चकमक केल्याचा आरोप करणारा अहवाल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यास राज्य सरकारची हरकत नाही, असंही सरकारी वकिलांनी सांगितलं.
काय म्हणाले अक्षय शिंदेचे आईवडील? : सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या आईने बोलण्याची परवानगी मागितली. "हा खटला आम्हाला लढवायचा नाही", असं त्या म्हणाल्या. अक्षय शिंदेच्या वडिलांनीही हीच भूमिका मांडताना सांगितलं, "आम्हाला हा ताण आणि धावपळ सहन होत नाही. आमची सूनही नुकतीच बाळंतीण झाली असून ती एकटीच असते. त्यामुळं आम्ही तिच्याकडं राहायला जाणार आहोत. त्यामुळं हा खटला लढायचा नाही, तो बंद करण्यात यावा", अशी त्यांनी हात जोडून विनंती केली. यावर न्यायालयाने त्यांना विचारलं की, तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना? त्यावर, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, असं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
दबाव आणला जात होता का? काय म्हणाले होते वकील? : गुरुवारी झालेल्या सुनावणीबाबत कटारनवरे यांनी सांगितलं की, या प्रकरणी ५ पोलिसांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. हे प्रकरण कसं थांबलं जाईल, कसं पचवलं जाईल, संबंधित व्यक्तींना कसं वाचवलं जाईल, याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, या देशात कायद्याचे राज्य संविधानाच्या माध्यमातून चालते. ही केस फक्त अक्षय शिंदेपुरती मर्यादित नाही. हा गुन्हा कोठडीतील मृत्यूसबंधी आहे. हा गुन्हा एका व्यक्तीविरोधात नाही, तर समाजाविरोधात घडलेला गुन्हा आहे, असं ॲड. कटारनवरे यांनी सांगितलं. या प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही, गुन्हा दाखल करण्यात काय अडचण आहे? उद्या मानवाधिकार आयोगाने दिलासा दिल्यास संबंधित पोलिसांसमोर इतर कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, असा युक्तिवाद ॲड. कटारनवरे यांनी केला. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांना धमकावले जात असल्याचा आरोप त्यांचे वकील अमित कटारनवरे यांनी ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीनंतर केला होता. संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही आणि अक्षय शिंदेच्या पालकांना धमकावलं जात असल्याचं कटारनवरे यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा -