मुंबई - Vinesh Phogat Disqualified :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून देशासाठी वाईट बातमी आली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र घोषित करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनेशला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं आहे. या बातमीनं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. आता या प्रकरणावर सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर विनेशचा एक पोस्ट शेअर केली असून यात कॅप्शनमध्ये लिहिलं, "100 ग्रामच्या कहाणीवर कोण विश्वास ठेवणार आहे?"
स्टार्सनं दिला विनेश फोगटला पाठिंबा : याप्रकरणी, विकी कौशलनं लिहिलं आहे की, "विनेश फोगट ही पदकांच्या पलीकडची एक विजेती आहे.' यानंतर तापसी पन्नूनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, "अधिक वजनामुळे विनेश फोगट ही महिलांच्या 50 किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून डिसक्वालीफाय झाली आहे. हे खूप दुःखद आहे." यानंतर सोनाक्षी सिन्हानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, "आत्ता कसं वाटत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. तू चॅम्पियन आहेस आणि नेहमीच राहशील याशिवाय मी काय बोलू शकते." यानंतर फरहान अख्तरनं त्याच्या पोस्टवर लिहिलं, "डियर विनेश फोगट, तुम्ही किती निराश असाल याची कल्पनाच करता येणार नाही, मला आता देखील समजलं नाही, तुमच्यासाठी खूप वाईट वाटत आहे, पण कृपया जाणून घ्या की आम्हा सर्वांना तुमचा आणि तुम्ही खेळासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचा अभिमान आहे. तुम्ही नेहमीच चॅम्पियन आणि लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान असाल. धैर्य राखा."
सेलिब्रिटींनी केलं दु:ख व्यक्त :साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं विनेशच्या दुःखावर फुंकर घालत इन्स्टाग्रामवर तिचा फोटो आणि एक नोट शेअर करत लिहिलं की, "कधीकधी सर्वात नम्र व्यक्तीला कठीण अडथळ्यांचा सामना करावा लागतो. लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात, एक सर्वात शक्तिशाली शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. अडचणीतही चिकाटी ठेवण्याची तुमची विलक्षण क्षमता खरोखरच कौतुकास्पद आहे. तुमच्या सर्व चढ-उतारात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू." दरम्यान वरुण धवन, रकुल प्रीत सिंग, पुलकित सम्राट, करिना कपूर खान, आलिया भट्ट भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी विनेश फोगटला पाठिंबा दिला आहे.