मुंबई - मराठीत आजवर बनत असलेल्या कथा आणि आशयप्रधान चित्रपटाच्या परंपरेत बसणारा आणखी एक चित्रपट 17 जानेवारीला रिलीज होणार आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे कलाकार स्वप्निल जोशी आणि प्रसाद ओक यांची यात प्रमुख भूमिका असेल. दे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच 'जिलबी' या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. याशिवाय शिवानी सुर्वे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य, राजेश कांबळे, पंकज खामकर, दिलीप कराड, अभिजीत दुलघच आणि पर्ण पेठे यांच्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका असतील.
नितीन कांबळे दिग्दर्शन करत असलेल्या 'जिलबी' चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि रुपा पंडित यांनी केली आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी गणेश उत्तेकर यांची आहे तर कुशाल सिंगनं कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. संगीतकार अमर मोहिले यांचं संगीत जिलबीला लाभलं आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मछिंद्र बुगडे यांनी लिहिली आहे.
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी आज एक पोस्ट लिहून 'जिलबी' हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होत असल्याचं म्हटलंय. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि अल्ट्रा मेडिया अँड इंटरटेन्मेंट प्रेझेन्टेशनच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती झाल्याचं तरण आदर्शन यांनी कळवलं आहे.
'जिलबी' या चित्रपटाचे आकर्षक पोस्टरही आदर्श यांनी पोस्टमध्ये टाकले आहे. जिलबी 'गोड ही आणि गूढ ही' अशी बायलाईन या शीर्षकाला देण्यात आली आहे. पोस्टरवर प्रसाद ओक आणि स्वप्निल जोशी यांचा अतिशय करारी लूक दिसत आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही देणारा असल्याचं पोस्टरवरुन दिसत आहे. पोस्टरवरील सर्वच कलाकारांचे लूक लक्ष वेधणारे आहेत. या चित्रपटाचे रिलीज जसजसे जवळ येत जाईल तेव्हा याच्या प्रमोशनमधून चित्रपटाबद्दलची अधिक माहिती समोर येत जाईल. नितीन कांबळे यांनी यापूर्वी 'वेल डन भाल्या', 'मी आणि तू', 'धो धो पावसातली वनडे मॅच', 'शिरपा', 'चंद्रकला', 'लडतर', 'सत्या', 'प्रेम योगा योग' आणि 'कॉफी' यासारख्या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या कथाकथनाचं कौतुक प्रेक्षकांसह समीक्षकांनीही केलं आहे. त्यामुळे 'जिलबी' या आगामी चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.