मुंबई - 'देव माणूस' या मराठी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. तेजस देवस्कर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती लव रंज आणि अंकुर गर्ग यांनी केली असून आता या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं तरण आदर्श यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
लव रंजन यांच्या लव फिल्म्सनं आतापर्यंत 'तू झुटी मैं मक्कार', 'दे दे प्यार दे' आणि 'सोनू के टिटू की स्विटी' यासारखे मनोरंजक चित्रपट बनवले आहेत. आता या बॅनरच्यावतीनं देव माणूस हा मराठी चित्रपट बनवला आहे.
सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित 'संगीत मानापमान' सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याआधी बालगंधर्व, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयक्षमतेनं प्रेक्षकांचं प्रेम मिळविलेल्या सुबोध भावेनं आता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्याबरोबर 'देवमाणूस' मध्ये झळकणार आहे.
तेजस देऊस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली शूटिंग पूर्ण झालेला 'देवमाणूस' हा चित्रपट प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यमय अनुभव देईल. याआधी तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंगसह छत्रीवाली यासारख्या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं आहे.
'वास्तव', 'नटसम्राट' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन आणि 'वॉन्टेड', 'दबंग', 'रेडी', 'ओएमजी : ओ माय गॉड', 'जुनं फर्निचर' सारख्या चित्रपटातून अभिनय करणाऱ्या महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. तसेच रेणुका शहाणे यांनी 'हम आपके है कौन', 'अबोली', 'रिटा', 'दुसरी गोष्ट' सारख्या चित्रपटात अभिनय आणि रिटा, काजोल अभिनित 'त्रिभंग' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात सुबोध भावे यांच्या 'तुला पाहते रे', 'चंद्र आहे साक्षीला', 'तू भेटशी नव्याने' सारख्या मालिकांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळालं. हल्लीच 'वाळवी', 'फुलराणी', 'हॅशटॅग तदेव लग्न' सारखे त्यांचे चित्रपट गाजले. असे हे तीन दिग्गज कलाकार, महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे, 'देवमाणूस' या चित्रपटातून एकत्र आले आहेत ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.