मुंबई - Stree 2 Sarkata Fame actor : सध्या बॉलिवूडमध्ये 'स्त्री 2' फेम 'सरकटा'चा थरार आहे. 'स्त्री 2' मधील 'सरकटा'ची भूमिका साकारणारा सुनील कुमार हा चर्चेत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' हा चित्रपट राज्य करतोय. या चित्रपटातून सुनीलनं आपल्या अभिनयानं आणि चेहऱ्यावरील भीतीदायक हावभावांनी प्रेक्षकांना घाबरवण्याचं काम खुबीनं केलं आहे. तसंच सुनीलला 'कल्की 2898 एडी'मध्ये देखील अमिताभ बच्चनची बॉडी डबल करण्याची संधी मिळाली होती. नुकतेच एका मुलाखतीत सुनील कुमारनं खुलासा केला आहे की, तो 'केजीएफ' स्टार यशबरोबर काम करत आहे.
सुनील कुमारनं अली फजलबरोबरचा फोटो केला शेअर : सुनील कुमार हा यशच्या 'टॉक्सिक' या मोस्ट अवेटेड चित्रपटात दिसणार असल्याचा अंदाज आता बांधला जात आहे. दरम्यान 'मिर्झापूर'च्या गुड्डू भैय्या उर्फ अली फजलबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सुनील आणि अली दोघेही उभे असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सुनीलनं लिहिलं, "अली फजल, गुड्डू भैयाबरोबर शॉट." आता सुनील कुमारच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. सुनीलचे बरेच चाहते या पोस्टवर लाइक बटण क्लिक करत आहेत. 'स्त्री 2'मुळे सुनील हा प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याला अनेक चित्रपटांच्या आता ऑफर्स मिळू लागल्या आहेत.