मुंबई - Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. हे लग्न शत्रुघ्न सिन्हा यांचा विचार न घेता सोनाक्षी करत असल्याच्या चर्चा काही दिवसापासून ऐकू येत होत्या. मात्र या सगळ्या चर्चेंना खोडून काढत शत्रुघ्न यांनी गुरुवारी संध्याकाळी पहिल्यांदाच त्यांचा होणारा जावई झहीर इक्बालची भेट घेतली. दोघांनीही हसत हसत कॉम्प्लेक्सच्या बाहेर जमलेल्या पापाराझींना फोटोसाठी पोज दिली.
गुरुवारी संध्याकाळी पापाराझी अकाऊंटद्वारे पोस्ट केलेल्या नवीन इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये सोनाक्षीच्या लग्नापूर्वी झहीर बरोबर शत्रुघ्न सिन्हा पहिल्यांदाच दिसले. शत्रुघ्न आणि झहीरने मिठी मारली आणि फोटोग्राफर्सना पोज दिली. शत्रुघ्न सिन्हा यांनी हसत पोज देत असताना पापाराझींच्या विनंतीला प्रतिसाद देताना 'खामोश!' हा आयकॉनिक डायलॉग बोलून सर्वांना खूश केलं.
शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नासाठी आनंदी आणि उत्साही दिसले. झहीरने नम्रपणे उभं राहत त्यांच्या बरोबर पोज दिली. झहीर आणि शत्रुघ्न यांच्या भेटीच्या या व्हिडिओनंतर ते लग्नाला हजर राहणार की नाही असल्या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळाली आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला हजेरी लावल्याचे स्पष्टपणे सांगितलं होतं.
आपल्या मुलीबद्दलचा आनंद आणि कौतुक व्यक्त करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "मला सांगा, हे आयुष्य कोणाचं आहे? हे फक्त माझी एकुलती एक मुलगी, सोनाक्षीचं लाईफ आहे, जिचा मला खरोखर अभिमान आहे आणि ती माझ्यासाठी तिच्या ताकदीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे मी तिच्या लग्नाला उपस्थित राहणार का वगैरे असल्या प्रश्नांना काही अर्थ नाही."