मुंबई: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तसेच, रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं हृतिक रोशन, सलमान खान, दीपिका पदुकोण यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. 'छावा'ची क्रेझ पाहून असा अंदाज लावला जात आहे, की येत्या काळात हा चित्रपट अनेक विक्रम करू शकतो.
'छावा'ची कमाई : निर्मात्यांच्या मते, शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'छावा'नं 33.1 कोटी रुपयांची कमाई करून ओपनिंग केली. यासह हा 2025 मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला. एवढंच नाही तर 'छावा'नं 'गली बॉय'ला देखील मागे टाकत सर्वाधिक व्हॅलेंटाईन डे ओपनर चित्रपटाचा किताबही जिंकला. 2025 मधील आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्यासाठी 'स्काय फोर्स'ला मागे टाकल्यानंतर, 'छावा'नं दुसऱ्या दिवशी 39.3 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर 'छावा'चं देशांतर्गत बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन 72. 4 कोटी रुपये झालं.
'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शनचा तिसरा दिवस : सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रविवारी 'छावा'मध्ये ढोबळ आकडेवारीनुसार 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या ऐतिहासिक काळातील चित्रपटानं तिसऱ्या म्हणजेच पहिल्या रविवारी सुमारे बॉक्स ऑफिसवर 48.5 कोटी रुपये कमावले. यासोबतच, 'छावा' हा 2025मधील पहिल्या आठवड्यात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट बनला आहे. 3 दिवसांनंतर, 'छावा'नं भारतात 116.5 कोटी रुपये कमावले आहेत. रिपोर्ट्सनुसार, या कलेक्शनसह 'छावा'नं हृतिक रोशनचा 'फायटर', सलमान खानचा 'टायगर जिंदा है' आणि 'पद्मावत' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. 'फायटर'नं पहिल्या आठवड्यात 115.30 कोटी रुपये, 'टायगर जिंदा है'नं 114.93 कोटी रुपये आणि 'पद्मावत'नं 114 कोटी रुपये कमावले होते.
'छावा'चं जगभरातील कलेक्शन: हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचं देदीप्यमान जीवन चरित्र दाखवणारा 'छावा' दिवंगत शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या 'छावा' या वाचकप्रियतेचे उच्चांक नोंदवणाऱ्या 'छावा' या कादंबरीचं चित्रपटरुप आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी जगभरात अंदाजे 53 कोटी रुपयांची कमाई केली, यानंतर या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 100 कोटी रुपयांवर पोहोचलं. जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटी क्लबमध्ये सामील होणारा हा विकी कौशलचा 6वा आणि रश्मिकाचा 8वा चित्रपट आहे.
हेही वाचा :