हरिद्वार- प्रसिद्ध बॉलिवूड रॅपर यो यो हनी सिंग धार्मिक शहर हरिद्वार येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. हरिद्वारच्या प्राचीन दक्षिण काली मंदिरात त्यानं निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी त्यानं कैलाशानंद गिरी यांच्याशी संवाद साधला. संतानं यो यो हनी सिंगला त्यांचा आशीर्वाद दिला. आता सोशल मीडियावर यो यो हनी सिंग धर्मगुरुंचे आशीर्वाद घेत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात आचार्य महामंडलेश्वर स्वामी यांनी सांगितले की, "हनी सिंगची आपल्या धर्मावर विशेष श्रद्धा आणि आस्था आहे."
यो यो हनी सिंगनं घेतलं माता कालीचं दर्शन: यो यो हनी सिंगला हरिद्वार खूप आकर्षक वाटतं, हे त्याने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये देखील सांगितलं होतं. आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांना भेटण्यापूर्वी तो निलेश्वर महादेव मंदिरात गेला. त्यानं इथे पूजाविधीही केली. यो यो हनी सिंगनं यावेळी काली माताचे दर्शन घेतलं. यानंतर त्यानं माता कालीची पूजा केली. दरम्यान हनी सिंगनं नवरात्रीदरम्यानच्या विशेष विधी आणि पूजा पद्धतींबाबतही सविस्तर माहिती घेतली असल्याचं कैलाशानंद गिरी महाराज यांनी सांगितलं. हनी सिंगनं धर्मनगरीचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.