मुंबई- Shaheed Diwas 2024 : आज 23 मार्ज रोजी शहीद दिन आहे. देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आजच्या दिवशी इंग्रजांनी फाशी दिली होती. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. शहीद दिनानिमित्त या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ आम्ही तुमच्यासाठी काही देशभक्तीपर चित्रपट घेऊन आलो आहोत , जे तुम्ही आजच्या दिवसाला पाहू शकता.
ऐ वतन मेरे वतन :अभिनेत्री सारा अली खान आणि इमरान हाश्मी स्टारर देशभक्तीपर चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन' नुकताच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान उषा मेहता नावाच्या क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. उषा मेहता यांनी रेडिओच्या माध्यमातून देशात क्रांतीचा नवा बिगुल फुंकला होता. सारा पहिल्यांदा देशभक्तीपर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन्सनं केली आहे.
बंगाल 1947 : पीरियड ड्रामा फिल्म 'बंगाल 1947' ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी अभिनीत हा चित्रपट राजकीय घडामोडीवर आधारित आहे . 'बंगाल 1947', लेखक आणि दिग्दर्शन आकाशदीप लामा यांनी केलं आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.