मुंबई Salman Khan : बॉलिवूडमधील दबंग खान, सिनेसृष्टीतील भाईजान आणि प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याआधीही अभिनेता सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा त्याच्या घराच्या भिंतीवर आणि गॅलरीत गोळीबार केल्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केलीय. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन अभिनेता सलमान खान याच्यासोबत गोळीबाराच्या प्रकाराबाबत चर्चा केलीय.
अतिरिक्त सुरक्षा पुरवणार :अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली. "घाबरण्याचं मुळीच कारण नाही. काळजी करू नका. तुम्हाला राज्य सरकारकडून अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात येईल," असं आश्वासन यावेळी फोनवरील संभाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला दिल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्ष देखील सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर आता गोळीबारानंतर सलमानच्या घरी सुरक्षा वाढविण्यात आलीय.
पोलिसांकडून कसून तपास सुरु :अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सकाळपासून सलमान खानच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आलीय. तसंच ज्या ठिकाणी भिंतीवर आणि गॅलरीत गोळीबार झाला त्या ठिकाणचे फोटो आणि माहिती पोलिसांनी घेतलीय. ज्या अज्ञातांनी गोळीबार केला आहे, त्यांना लवकरात लवकर शोधून काढण्यात येईल, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय. तर अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा सरकारकडून सखोल तपास करण्यात येत आहे. लवकरात लवकर आरोपींना शोधण्यात येईल आणि अतिशय जलदगतीनं तपास करण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का? - विरोधक :कायदा आणि सुव्यवस्था कुठंही दिसत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर केलीय. " राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गृहमंत्र्यांचं याकडं लक्ष नाही. त्यामुळं 'अब की बार गोळीबार सरकार'", अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. तर तुमचं सरकार 'वसुली सरकार' होतं असं प्रत्युत्तर आमदार नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिलंय.
हेही वाचा :
- अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
- सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan