मुंबई : लॉरेन्स बिश्नोई टोळीनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर, त्याच्या जीवाला धोका आहे. आता सलमानच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे. सलमाननं 'हम साथ साथ हैं'च्या शूटिंगदरम्यान काळवीटाची शिकार केली होती. बिश्नोई समाजात काळ्या हरणाची देवाप्रमाणे पूजा केली जाते. हे प्रकरण 1998चं आहे, जे अद्याप थंड झालेले नाही. सलमाननं काळवीटाची शिकार केली नसल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी आणि त्यानं स्पष्टपणे सांगितलं आहे. आता ताज्या रिपोर्टनुसार लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावानं धक्कादायक दावा केला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाच्या म्हणण्यानुसार, सलमान खाननं प्रकरण शांत करण्यासाठी ब्लँक चेक दिला होता.
सलमाननं ब्लँक चेक दिला :रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोईनं दावा केला आहे की, "जेव्हा सलमान खान काळवीट प्रकरणात अडकू लागला, त्यावेळी तो प्रकरण शांत करण्यासाठी बिश्नोई समाजाकडे ब्लँक चेक घेऊन आला होता. याशिवाय चेकवर इच्छित रक्कम भरा, असं त्यानं यावेळी म्हटलं होतं. बिश्नोई समाजाला पैशात रस नव्हता, सर्वजण त्यावेळी पूज्य हरणाच्या बाजूने होते." दरम्यान काळवीट प्रकरणी सलमानचे वडील सलीम खान यांनी दावा केला होता की, लॉरेन्स बिश्नोई केवळ पैशासाठी सलमान खानचा छळ करत आहेत.