मुंबई- Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी त्यांच्या मुंबईतील घरी झालेल्या शूटिंगच्या घटनेबद्दल पहिल्यांदा खुलासा केला आहे. ज्येष्ठ पटकथा लेखक असलेल्या सलीम यांनी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा मुलगा सलमान खानला धोका निर्माण करणाऱ्या लोकांना "जाहिल (अडाणी)" असं म्हटलंय. खान कुटुंबाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अतिरिक्त पोलीस संरक्षण मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
"या जाहिल लोकांबद्दल काय सांगायचं जे म्हणतात की मारल्यानंतर कळेल", असं सलीम प्रतिक्रिया देताना म्हणाले. त्यांनी कडक सुरक्षेवर जोर देऊन सलीम खान यांनी सांगितले: "मुंबई पोलिसांनी आमचे मित्र आणि कुटुंब सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिलं आहे. जर त्यांनी आधीच दोन लोकांना ताब्यात घेतले असेल तर ते निश्चितपणे त्याबाबत सक्रियपणे काम करत आहेत."
पटकथाकार सलीम खान यांनी सलमानला त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार काम करण्याचा सल्ला दिलाय. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने सलमानला सार्वजनिक ठिकाणी चर्चा न करण्यास सांगितले आहे. 14 एप्रिल रोजी त्यांच्या अपार्टमेंटबाहेर झालेल्या शूटिंगनंतर सलीम खान यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं आहे.
रविवारी सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. संशयित सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानापासून पायी निघाले, चर्चजवळ त्यांनी त्यांची दुचाकी टाकून दिली आणि नंतर ऑटोरिक्षाने वांद्रे रेल्वे स्थानकाकडे गेले. त्यानंतर, त्यांनी सांताक्रूझ स्टेशनवर जाण्यासाठी दुसरी ऑटो-रिक्षा भाड्याने घेतली तिथून ते कच्छ, गुजरातला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले.
बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही येथील विक्की साहब गुप्ता (२४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (२१) या दोन आरोपींना १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अनमोल बिश्नोईच्या टोळीने या दोघांची भरती केली होती आणि त्यांना गुन्ह्यासाठी पैसेही मिळाले आहेत.