मुंबई - Salman khan firing case :एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर अनेकांना धक्का बसला होता. 14 एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कसून चौकशी करत आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे. अलीकडेच पोलिसांनी या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरीला राजस्थानमधून अटक केली होती. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला हरियाणातून अटक केली.
गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक : या आरोपीचं नाव हरपाल सिंग आहे. हरपालवर मोहम्मद चौधरीला पैसे देऊन रेकी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम पंजाबमधून दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर गुजरातमधील भुज इथून दोन आरोपींना पकडण्यात आलं होतं. आता राजस्थान आणि हरियाणामधून झालेल्या अटकेवरून सलमानच्या घरावरील हल्ल्याचं प्रकरण खूप मोठे असल्याचं दिसत आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन शूटर्सनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर 5 राऊंड फायर केले. एक गोळी सलमानच्या घराच्या भिंतीला लागली, तर दुसरी गोळी घराच्या जाळीला छेदून ड्रॉईंग रूमच्या भिंतीवर लागली. गोळीबार करणारे हल्लेखोर घटनास्थळी त्यांची दुचाकी सोडून पळून गेले होते.