मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 24 जानेवारी 1981 रोजी कोलकाता येथे जन्मलेली रिया एका ऐतिहासिक आणि राजेशाही घराण्यातून आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. तिची आजी इला देवी कूचबिहारची राजकुमारी होती. तसेच रियाची आई मूनमून सेन आणि आजी सुचित्रा सेन या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रिया सेनचा चित्रपट प्रवास तिच्या बालपणात सुरू झाला. तिनं आपल्या अभिनयाची कारकिर्द पाचव्या वर्षीपासून केली. 1991मध्ये ती 'विष कन्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. रियाला तिच्या चित्रपट प्रवासातील पहिलं मोठं यश 2001 मध्ये आलेल्या 'स्टाईल' चित्रपटानं मिळून दिलं.
रिया सेनला मिळाली 'या' चित्रपटामधून प्रसिद्धी :'स्टाईल' चित्रपट कमी बजेटचा विनोदी चित्रपट होता. या चित्रपटामधील गाणी आणि विनोद खूप गाजले होते. यानंतर तिला हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळू लागलं. रियानं मॉडिंगमध्ये चांगलेच यश मिळवले. अभिनेत्री म्हणून चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी तिनं 1998 मध्ये फाल्गुनी पाठकच्या 'याद पिया की आने लागी' या म्युझिक व्हिडिओत काम केलं. या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर रिया अनेक फॅशन शो, म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये झळकली. एका रिपोर्टनुसार मॉडेलिंग कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिनं 2006मध्ये एका सॉफ्ट ड्रिंक ब्रॅन्डच्या जाहिरातीमध्ये दीपिका पदुकोणची जागा घेतली होती. यानंतर तिनं अनेक मोठ्या ब्रॅन्डसाठी काम केलं.