मुंबई - अभिनेता विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते आणि समीक्षकांनी त्याचं कौतुक केलंय. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कशी कमाई केली याची पहिल्या दिवशीची आकडेवारी जाहीर झाली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटानं शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 1.41 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
"'द साबरमती रिपोर्ट'ची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली आहे. देशातील प्रमुख केंद्रांवर त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे... विशेष म्हणजे, या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचे संकलन विक्रांत मॅसीच्या पूर्वी रिलीज झालेल्या '12 वी फेल' चित्रपटाच्या 1.10 कोटीच्या बरोबरीचे आहे. असं असलं तरी वीकेंडमध्ये एकूण वाढ होण्यासाठी चित्रपटानं अजून चांगले प्रदर्शन करणं आवश्यक आहे.", असं तरण आदर्श यांनी लिहिलं आहे.
आकडेवारीची तुलना करायची झाल्यास विक्रांत मॅसीचा हा चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या व्यवसायाचा विचार करता पासंगालाही पुरत नाही. मात्र '12 वी फेल'ची कमाई सुरुवातीला कमी झाली होती तरी त्या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीतून बळ मिळाले आणि प्रेक्षक थिएटरकडे वळले होते, ते पाहता या चित्रपटाच्या कमाईचा आलेख कालांतराने वर जाण्याची शक्यता आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, विक्रांत मेस्सी अलीकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या '36' या वेब सीरिज साठी देखील चर्चेत आहे.
धीरज सरना दिग्दर्शित आणि शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल यांची संयुक्त निर्मिती असलेला 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीच्या सत्यघटनेच्या विषयावर आधारित चित्रपट आहे. यामध्ये हिंदी भाषिक टीव्ही वाहिनीचा पत्रकार आणि त्याचे वरिष्ठ यांच्यातील वैचारिक वादावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा 2002 साली गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित आहे. अयोध्येहून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या दोन बोगींना आग लागून झालेल्या अपघातात 59 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर या प्रकरणाच्या तपासापेक्षा त्यानंतर तापलेलं राजकारणाचीच जास्त चर्चा झडली होती. हेच सत्य उघडण्याच्या हेतूनं 'साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये समर कुमार या हिंदी मीडियमच्या पत्रकाराची भूमिका विक्रांत मॅसीनं साकारली आहे.