मुंबई Randeep Hooda on Oppenheimer Movie : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणदीपनं 'ओपेनहाइमर' या हॉलिवूड चित्रपटाला प्रोपोगंडा असल्याचं म्हटलं होतं. एका पॉडकास्ट चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रणदीपनं हिरोशिमा नागासाकी बॉम्बस्फोट आणि व्हिएतनाममधील अमेरिकेच्या या वेदनादायक हल्ल्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या विषयावर त्यानं म्हटलं, ''अमेरिकेनं 'ओपेनहाइमर' हा चित्रपट बनवला. या चित्रपटामध्ये त्या माणसाची कहाणी आहे, ज्याला न्यूक्लियर बॉम्बचा जनक देखील म्हटले जाते.''
रणदीप हुड्डानं 'ओपेनहाइमर' चित्रपटावर केलं वक्तव्य : पुढं त्यानं म्हटलं, ''हिरोशिमा, नागासाकी येथे बॉम्बस्फोट झाला, तेव्हा जपानमधील ती वेदनादायक रात्र कोणाला आठवत नाही का? अमेरिकेचा विश्वास आहे की तो सर्वोत्तम देश आहे. त्यांची आर्मी सर्वात बलवान आहे. त्यांच्या मते जर्मन आणि जपानी लोक वाईट आहेत. इतिहासातही असेच काहीसे लिहिलं गेलं आहे. अमेरिकेनं आपल्या देशातील नायकांवर चित्रपट बनवला आहेत. 'ओपेनहाइमर' चित्रपटात चांगुलपणाबद्दल सांगण्यात आलं आहे. आपण अनेकदा आपल्या देशाच्या वीरांवर प्रश्न उपस्थित करत असतो. 'ओपेनहाइमर' चित्रपटात नाण्याच्या दोन्ही बाजू नाही, तर एकच बाजू दाखवण्यात आली आहे. त्याच्या मते, फक्त एखाद्याचा चांगुलपणा दाखवणे सोपे आहे.''