मुंबई - Rakhi Sawant :बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. आता या प्रकरणी राखीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलमान खानसाठी आवाहन केलं आहे. तिनं सलमानला उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे. राखी सावंतची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सलमान खान हा गरिबांचा मसीहा असल्याचं म्हणत आहे. याशिवाय ती पंतप्रधान मोदींनी सलमानची मदत करावी याबद्दल म्हणताना दिसत आहे.
राखी सावंतनं केली पंतप्रधान मोदींना विनंती : या मुलाखतीत तिनं म्हटलं, "मी हात जोडून सलमान भाईला सांगेन की, त्यानं कधीही ईद आणि वाढदिवसाच्या दिवशी बाल्कनीत येऊन उभे राहू नये. तुम्ही चाहत्यांना भेटण्यासाठी एखादे मोठं हॉटेल बुक करू शकता, जिथे कडक सुरक्षा असेल." पुढं तिनं म्हटलं, "कोहिनूर हिऱ्यापेक्षा सलमान खान आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. सलमान खानचे संरक्षण करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. तो गरिबांचा मसीहा आहे. त्याला झेड, वाय, एक्स, या सर्व वर्गातील सुरक्षा द्याला पाहिजे." राखीनं अशी विनंती मोदीजींना केली आहे. यानंतर तिनं पुढं सांगितलं, "कंगना राणौतला इतकी सुरक्षा देण्यात आली आहे, तिच्या मागे कोणीच लागलं नाही, तरीही तिला विनाकारण सुरक्षा दिली आहे. सलमान खानला खूप सुरक्षा देण्याची गरज आहे, असं मला वाटते. तो बॉलीवूडचा एक दिग्गज आहे."