मुंबई - व्हॅलेंटाईन डे आठवड्यात आज 9 फेब्रुवारी रोजी शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर 'तेरी बातो में ऐसा उल्झा जिया' रिलीज झाला. त्यावेळी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील रजनीकांत, विष्णू विशाल, विक्रांत आणि जीवथा स्टारर चित्रपट 'लाल सलाम' देखील भेटीस आला. बॉलिवूड चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आता रजनीकांतच्या 'लाल सलाम' या चित्रपटाला प्रेक्षक किती प्रेम देतात हे जाणून घेऊया.
'लाल सलाम' हा चित्रपट रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात रजनीकांतचा एक उत्कृष्ट आणि विस्तारित कॅमिओ रोल आहे. आता सोशल मीडिया हँडल X वर 'लाल सलाम'ला उत्तम रिव्ह्यू मिळत आहेत. चेन्नईतील थिएटरबाहेर प्रेक्षकांची गर्दी दिसत असून 'थलायवा'ची जादू पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे.
एका चाहत्याने लिहिले आहे की, "रजनीकांतची एन्ट्री अपेक्षेपेक्षा खूपच जास्त जबरदस्त आहे, हा एक उत्तम चित्रपट आहे." त्याचबरोबर एका प्रेक्षकाने लिहिले आहे की धार्मिकदृष्ट्या हा चित्रपट समरसतेचा एक अद्भुत संदेश देतो. त्याने लिहिले आहे, 'आम्ही जिंकलो, ऐश्वर्या रजनीकांत.. तुझा चित्रपट एक ठोस संदेश देत आहे.'