मुंबई - रणवीर अलाहाबादियानं इंडियाज गॉट लेटेंटमधील या एका वेब शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात शोचा निर्माता आणि कॉमेडियन समय रैनाला पुढील पाच दिवसांत मुंबई पोलिसांच्यासमोर हजर राहण्यास सांगितलं आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं. समय रैना सध्या अमेरिकेत आहे आणि त्यानं चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी अधिक वेळ मागून घेतला आहे, असे पोलिसांनी सांगितलं.
सोशल मीडिया इन्फ्लुयन्सर अलाहाबादियानं समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" या यूट्यूब शोमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात सायबर सेल आणि मुंबई पोलीस स्वतंत्रपणे तपास करत आहेत. बई पोलिसांनी रैनाला १७ फेब्रुवारीपूर्वी त्याचा जबाब नोंदवण्यास सांगितलं आहे, तर सायबर सेलनं त्याला १८ फेब्रुवारी रोजी हजक राहण्यासाठी समन्स बजावलं आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितले.
रणवीर अलाहाबादिया आणि काही इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसंदर्भात मुंबईत असलेल्या आसाम पोलिसांच्या पथकाने गुरुवारी महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याआधी, तपास पथकानं बुधवारी खार पोलिस ठाण्याला भेट दिली आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
गुवाहाटी पोलिसांनी सोमवारी अलाहबादिया आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अलाहबादियाच्या रिअॅलिटी शोवरील कमेंटबाबत सोशल मीडिया इन्फ्लुयन्सर अपूर्व मखीजा हिच्यासह सात जणांचं जबाब नोंदवलं आहेत, असंही अधिकाऱ्यानं सांगितलं. महाराष्ट्र सायबर विभागाने अलाहबादिया आणि रैना यांच्यासह ४० हून अधिक जणांना समन्स बजावलं आहे आणि त्यांना यूट्यूब रिअॅलिटी शोवरील अलाहबादियाच्या वादग्रस्त कमेंटवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीत सामील होण्यास सांगितलं आहे.
या प्रकरणात एफआयआर नोंदवणाऱ्या सायबर पोलिसांनी मंगळवारी सोशल मीडिया इन्फ्लुयन्सर आणि "इंडियाज गॉट लेटेंट" च्या मागील भागांमध्ये सहभागी झालेल्या 'पाहुण्या' आणि 'परीक्षक' यांच्यासह इतरांनाही नोटीस बजावली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १.६ कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेला रणवीर अल्लाहबादियाचा लैंगिकतेबद्दल केलेल्या वादग्रस्त कमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रणवीर अलाहाबादियानं व्हिडिओ माफीनामा जारी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं वागणं चुकलं होतं हे या माफीनाम्यात तो उघडपणे करताना दिसतो.
हा मुद्दा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतही उपस्थित केला आहे. यामध्ये त्यांनी सोशल मीडियाचं यमन करण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय महिला आयोगानं (NCW) मंगळवारी अल्लाहबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा, जसप्रीत सिंग आणि आशिष चंचलानी तसेच शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.