मुंबई - 'यंदा कर्तव्य आहे...' अशी परिस्थिती असणाऱ्या मुलामुलींसाठी 'स्थळ' बघण्याचा कार्यकम ठरवला जातो. जेथे जास्तीतजास्त लव्ह मॅरेज होत आहेत तेथे बऱ्याच प्रमाणात अरेंज्ड मॅरेज सुद्धा होत आहेत, खासकरून छोट्या शहरांमध्ये आणि गावांत. अशा लग्नांसाठी स्थळं बघितली जातात. आता एक नवीन मराठी सिनेमा येऊ घातलाय ज्याचे नाव आहे 'स्थळ'. नावावरून कल्पना आलीच असेल की हा चित्रपट लग्न या विषयाभोवती फिरणारा असणार. या चित्रपटातील 'पाहुणे येत आहेत पोरी...' हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आलं असून त्यात लग्न जमवण्याची गडबड, वधू वराच्या कुटुंबाची लगीनघाई याची झलक दर्शविण्यात आली आहे.
'स्थळ' च्या प्रस्तुतीची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी उचलली असून या चित्रपटाची निर्मिती जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर आणि रिगा मल्होत्रा यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केलं असून, ग्रामीण भागातील लग्न व्यवस्थेचा वेगळ्या दृष्टिकोनातून शोध घेणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी आणि मानसी पवार हे नवोदित कलाकार झळकणार आहेत.
अरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर आधारित असलेला हा चित्रपट ग्रामीण संस्कृतीतल्या लग्न व्यवस्थेचे अनोखे चित्रण करणारा आहे. "पाहुणे येत आहेत पोरी..." या गाण्याला पारंपरिक सूरांचा साज चढवलेला असून त्यात खेड्यातील पारंपरिक चालींची झलक दिसते. हे गीत मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं असून, जयंत सोमलकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला माधव अगरवाल यांनी सुंदर चालीत बांधलं आहे. विशेष म्हणजे, हे गाणं एका व्यावसायिक गायिकेने गायलेले नसून, गायनाची आवड असलेल्या चंद्रपूर जवळच्या एका महिलेने, मीराबाई येते यांनी, आपल्या खास शैलीत सादर केलं आहे. पारंपरिक हार्मोनियम आणि तालाच्या सुरेख मिश्रणामुळे या गाण्यातील बोल अधिक उठावदार झाले आहेत.
'स्थळ' हा चित्रपट, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, ७ मार्चला प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -