मुंबई - Pushpa 2 The Rule Postponed : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा: द रुल' हा २०२४ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे यात शंकाच नाही. ऑगस्टमध्ये रिलीज होण्यासाठी चाहते खूप उत्सुक असताना, या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलल्याच्या बातम्यांमुळे आणि नवीन रिलीजची तारीख जाहीर न केल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा अशा बातम्यांवर विश्वास नव्हता. काहींना तर हा पुष्पाच्या प्रमोशनसाठीचाच खेळ वाटला. परंतु अल्लू अर्जुननंच स्वतः नवी तारीख जाहीर केली आहे.
या दिवशी 'पुष्पा 2' प्रदर्शित होणार आहे
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' यापूर्वी 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार होता. पण, आता हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर नवीन रिलीजची अधिकृत घोषणा केली. चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना त्यानं कॅप्शन लिहिलं, "पुष्पा 2: द रुल' 6 डिसेंबर 2024 पासून चित्रपटगृहांमध्ये!"
"पुष्पा 2: द रुल'चं नवीन पोस्टर
अल्लू अर्जुनने नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुननं राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे. त्याच्या खांद्यावर तलवार असून तो कॅमेऱ्याकडे रागानं पाहत आहे. अल्लू अर्जुनचं हे पोस्टर पाहून आणि नवीन रिलीजची तारीख जाहीर करताच चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी याबद्दल उत्सुकता आणि आनंद व्यक्त केला असला तरी प्रदर्शन लांबणीवर पडल्यानं अनेकांना दुःखही झालंय. गायक बी प्राकने लिहिलं, ' आता जास्त प्रतीक्षा करू शकत नाही'. तर एकाने लिहिलं, 'मी याची आतुरतेने वाट पाहत आहे'.